सुरतमार्गे गुवाहाटीमध्ये दाखल झालेले शिंदे गटाचे आमदार आज पहिल्यांदाच हॉटेल रॅडिसन बाहेर पडले. त्यांनी कडेकोट बंदोबस्तात कामाख्या देवीचे दर्शनही घेतले. यानंतर ते गोव्याच्या दिशेने जाणार आहेत. शिवसेनेच्या बंडखोर गटाचे नेते एकनाथ शिंदे हे उद्या मुंबईत दाखल होणार आहेत. मुंबईत आल्यानंतर ते थेट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला भेट देणार असल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. त्यामुळे उद्या शिवसैनिक आणि बंडखोर आमदारांचे समर्थक आमनेसामने येण्याची शक्यता आहे. शिवसेना बंडखोर आमदारांनी आज कामाख्या मंदिरात जाऊन देवीचे दर्शन घेतले. त्यानंतर शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला.
हेही वाचा- आमच्यावर कोणत्याही प्रकारचा दबाव नाही; ट्विट करत बंडखोर आमदारांचे स्पष्टीकरण
यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले, आमच्याकडे दोन तृतीयांश आमदार असून कोणावरही बळजबरी केली नसल्याचे त्यांनी म्हटलं आहे. तसेच बहुमताचा आकडा आमच्या बाजूने असल्याचा दावा त्यांनी केला. आपल्या देशात बहुमताला महत्त्व आहे. ते बहुमत आमच्याकडे असल्याचे त्यांनी म्हटले. महाराष्ट्राला विकासाच्या मार्गावर नेण्यासाठी आणि बाळासाहेबांचे हिंदुत्व जोपासण्यासाठी आम्ही हे पाऊल उचलले असल्याचे शिंदे यांनी सांगितले. तसेच याठिकाणी असलेले आमदार स्वत:च्या मर्जीने आलेले आहेत असेही त्यांनी स्पष्ट केलं.
शिवसेना प्रमुख दिवगंत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला भेट देणार असून त्यांना मानवंदना देणार आहोत. त्याशिवाय, धर्मवीर आनंद दिघे यांच्या स्मृतीस्थळीदेखील आम्ही आमदार जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
Previous Articleउदयपूर हत्याकांड! मुस्लिम लोक तालिबानी मानसिकतेचं समर्थन करणार नाहीत- अजमेर दर्गा प्रमुख
Next Article २९ जून सांख्यिकी दिवस म्हणून साजरा









