sanjayraut vs rajeshkshirsagar- शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत हे सातत्याने शिंदे गटाच्या आमदार आणि भाजपवर हल्लबोल करत आहेत. सतत खालच्या भाषेत टीका करणारे संजय राऊत यांचा राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष आणि शिंदे गटाचे नेते राजेश क्षीरसागर यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. संजय राऊत तुम्ही कोणाच्या जीवावर निवडून आला आहात हे सर्वाना माहिती आहे. आम्ही निवडणूक आयोगाच्या नियमाप्रमाणे दोन तृतीयांश बहुमत घेऊन वेगळा गट निर्माण केला आहे. मात्र तुम्ही आता ज्यांना विरोध करत आहात त्यांच्या जीवावर निवडून आलेला आहात. तुम्ही राज्यसभेचा राजीनामा द्या आणि मग बोला, तुम्हाला आमच्या आमदार- खासदारा विरोधात बोलायचा अधिकार नाही. आमच्या आमदारांचे ५०-५० वर्ष शिवसेनेसाठी योगदान आहे. तुम्ही जनतेमधून निवडणूक लढवून दाखवावे. तुम्ही नेहमीच मागच्या दाराने राज्यसभेवर जाता. वाटेल ते करून आणि बोलून शिवसेना संजय राऊतांनी संपवली. असा आरोप राजेश क्षीरसागर यांनी केला. ते कोल्हापुरात पत्रकार परिषदेत बोलत होते.
आज शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेत त्यांनी कर्नाटक सरकारला देखील धारेवर धरले. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी जबाबदारीने वक्तव्य करावे.देश सर्वांचा आहे.कोणी कुठ जायचं ? कोणी सांगू शकत नाही. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना असे वक्तव्य शोभत नाही. आम्ही संयम ठेवून काम करत आहोत. महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद हा प्रश्न सुप्रीम कोर्टात सुरू असताना कर्नाटक कडून चोराच्या उलट्या बोंबा सुरू आहेत. त्यामुळे कर्नाटकच्या मुखमंत्र्यानी राजीनामा द्यावा, अशी मागणी राजेश क्षीरसागर यांनी केली.
त्यानंतर त्यांनी राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांचा समाचार घेतला. आमच्या अगोदर अडीच वर्ष तुमची सत्ता होती. तुम्ही सीमा प्रश्र्नी काय केलं?असा सवाल क्षीरसागर यांनी संजय राऊत यांना केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेत येताच समिती नेमली. अगोदरच्या सरकारने वकिलांचे पगार देखील दिले नव्हते. काहीही विधान करून नागरिकांमध्ये वेगळे वातावरण निर्माण करण्याचा डाव संजय राऊत यांचा आहे. असा आरोप क्षीरसागर यांनी केला.









