ऑनलाईन टीम/तरुण भारत
मराठा क्रांती मोर्चाचे (maratha kranti morcha) समन्वयक रमेश केरे (Ramesh Kere patil) पाटील यांनी फेसबुक लाईव्ह करून विष प्राशन करत आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर पैसे घेतल्याच्या आरोप सोशल मीडियाच्या माध्यमातून होत होता. त्यामुळे फेसबूक लाईव्ह करत त्यांनी विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मुंबई येथे असताना त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असून, त्यांना जेजे हॉस्पिटलमध्ये पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, रमेश केरे पाटील यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून मराठा मोर्चावेळी राजकीय नेत्यांकडून आर्थिक लाभ मिळवण्याचा आरोप होत होता. सोशल मीडियावरून होत असलेल्या गंभीर आरोपांनंतर रमेश केरे पाटील यांनी आज थेट फेसबुक लाईव्ह करूनच स्वत:चं जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. विष प्राशन केल्याने केरे पाटील यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगितलं जात आहे.
अलीकडेच मराठा क्रांती मोर्चाची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. ज्यामध्ये केरे यांच्यावर पैसे घेतल्याचा आरोप झाला होता. ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यामुळे सोशल मीडियावर माझी बदनामी केल्याचा आरोप करत मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक रमेश केरे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. केरे यांच्या कृत्यामुळे मराठा क्रांती मोर्चाला मोठा धक्का बसला आहे.
हे ही वाचा : पुतिन यांच्या युक्रेन मोहिमेच्या प्रमुखाची आत्महत्या
रमेश केरे यांनी फेसबुक लाईव्ह करत मांडली भूमिका
आत्महत्येचा प्रयत्न करण्यापूर्वी रमेश केरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आपली भूमिका मांडली आहे. आशा, अक्षर भैया, गौरी मला माफ करा, मी आजवर मराठा समाजालाा ओबीसीमधून आरक्षण मिळावे यासाठी प्रामाणिक प्रयत्न केला. मराठा समाजातील विद्यार्थ्य़ांना न्याय मिळावा यासाठी मी प्रयत्न करत आलो आहे. माझं काम प्रामाणिक असल्यामुळे अनेकदा त्याची दखल घेण्यात आली, पण काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक क्लिप व्हायरल झाली आहे. ज्यात माझी जाणून बुजून बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. माझी जाणून बुजून बदनामी केली जात आहे. हे माझं शेवटचं फेसबुक लाईव्ह असेल ज्या लोकांनी व्हिडीओ क्लीप व्हायरल केली त्या लोकांची चौकशी झाली पाहिजे, असं म्हणत त्यांनी विष प्राशन करण्याचा प्रयत्न केला आहे. सध्या त्यांच्यावर मुंबईतील जेजे रुग्णालयात उपचार सुरू आहेत.