खानापुरात म. ए. समितीच्यावतीने हुतात्म्यांना अभिवादन : म. ए. समितीच्या भगव्या झेंड्याखाली एकत्र येऊन लढा तीव्र करणे आवश्यक
खानापूर : महाराष्ट्र सरकारने गांभीर्याने लक्ष देऊन केंद्रात सीमाप्रश्नाबाबत पाठपुरावा करून सीमाप्रश्न तातडीने सोडविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. मराठी अस्मितेच्या जपवणुकीसाठी सर्व मतभेद विसरून म. ए. समितीच्या भगव्या झेंड्याखाली एकत्र येऊन लढा तीव्र करणे गरजेचे आहे. सीमाप्रश्न सोडवणुकीसाठी आता अंतिम लढाई लढावी लागेल आणि त्याची सोडवणूक करून घेणे हीच हुतात्म्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे उद्गार अध्यक्ष गोपाळराव देसाई यांनी कै. नागाप्पा होसूरकर हुतात्मा स्मारकासमोर हुतात्म्यांना अभिवादन करताना काढले. प्रारंभी कै. नागाप्पा होसूरकर यांच्या प्रतिमेचे पूजन माजी आमदार दिगंबर पाटील यांच्या हस्ते करून सीमाप्रश्नासाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना अभिवादन केले.
माजी आमदार दिगंबर पाटील म्हणाले, सीमाप्रश्नाची सोडवणूक करून घेण्यासाठी महाराष्ट्र सरकारने एक कलमी कार्यक्रम म्हणून सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी केंद्रावर दबाव आणणे गरजेचे आहे. महाराष्ट्राने कणखर भूमिका घेऊन आता कर्नाटकाच्या जोखडातून सीमावायिसांना मुक्त करावे, सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीनंतरच हुतात्म्यांचे बलिदान सार्थकी लागणार आहे. यासाठी प्रश्न सोडवून घेण्यासाठी जे काही करता येईल, ते आपण सर्वांनी मिळून करू, मारुती परमेकर म्हणाले, सीमाभागातील अन्यायग्रस्त मराठी भाषिकांनी महाराष्ट्रातील जनतेच्या सहभागातून सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी महाराष्ट्रात तीव्र आंदोलन करण्याची गरज निर्माण झाली आहे.
सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी अंतिम लढाई
मुरलीधर पाटील म्हणाले, सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी आता अंतिम लढाई लढावी लागणार आहे. यासाठी सर्वांनी हुतात्म्यांचे स्मरण ठेवून एकदिलाने पुढील वाटचाल करुया, हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. पांडुरंग सावंत म्हणाले, सीमाप्रश्न सुटेपर्यंत या लढ्याशी प्रामाणिक राहणे हीच हुतात्म्यांना श्रद्धांजली आहे. जगन्नाथ बिरजे म्हणाले, हुतात्म्यांचे बलिदान वाया जाऊ नये, यासाठी आज हुतात्मादिनी सर्वांनी हुतात्म्यांचे स्मरण करून एकत्र राहणे गरजेचे आहे. यावेळी प्रकाश चव्हाण, अर्जुन देसाई, रणजित पाटील, रमेश धबाले, जयराम देसाई यांची हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहणारी भाषणे झाली.
हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी अनंत पाटील, विलास बेळगावकर, प्रभाकर साळगावकर, डी. एम. भोसले, अभिजीत सरदेसाई, रामचंद्र पाटील, शिवाजी पाटील, रुक्माण्णा झुंजवाडकर, नारायण कापोलकर, बाळाराम शेलार, तुळजाराम गुरव, मारुती गुरव, राजाराम देसाई, प्रल्हाद मादार, कृष्णा कुंभार, मऱ्याप्पा पाटील, संतोष पाटील, प्रवीण पाटील, लक्ष्मण पाटील, वसंत नावलकर, जयराम देसाई, पुंडलिक कारलगेकर, प्रवीण सुळकर, राघोबा मादार, पुंडलिक पाटील, शामराव पाटील, महम्मद बेलगामी, शरद पाटील, रविंद्र शिंदे, नारायण देसाई, नितीन देसाई, राजू चिखलकर यासह समिती कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.









