पुणे / प्रतिनिधी :
आधीच उन्हामुळे लाही लाही होत असताना महाराष्ट्राच्या बहुतांश भागात पुढील दोन दिवसांनंतर कमाल तापमानात 2 ते 3 अंश सेल्सिअसने वाढ होण्याचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. दरम्यान, राज्यात नागपूर येथे 43.2 अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले.
‘मोचा’ चक्रीवादळानंतर राज्य तसेच देशभरातील हवामान कोरडे झाले असून, पूर्व, वायव्य तसेच मध्य भारतातील कमाल तापमानात मोठय़ा प्रमाणात वाढ झाली आहे. विदर्भात सोमवारी काही ठिकाणी उष्णतेची लाट नोंदविण्यात आली, तर ओरिसा, पश्चिम बंगालमध्ये 17 मेपर्यंत, आंध्र किनारपट्टीवर मंगळवारपर्यंत उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.
राजस्थान, पंजाब, हरियाणात धुळीचे वादळ
राजस्थान, पंजाब व हरियाणाच्या भागात सोमवारी धुळीचे वादळ होते. 18 मेपर्यंत राजस्थानच्या भागात धुळीच्या वादळाचा इशारा देण्यात आला आहे.
पूर्वोत्तर भारतात पाऊस
अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालॅन्ड, मणीपूर, मिझोराम, त्रिपुरा या राज्यात 19 मेपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
महाराष्ट्राचे कमाल तापमान वाढणार
विदर्भात गेले काही दिवस उष्णतेची लाट नोंदविण्यात येत आहे. अकोला तसेच जळगावात गेले काही दिवस देशातील उच्चांकी तापमानाची नोंद झाली. सोमवारी अकोला, अमरावती व वर्ध्यात सर्वाधिक तापमान होते. दरम्यान, 17 मेनंतर राज्यातील बहुतांश भागात कमाल तापमान 2 ते 3 अंश सेल्सिअसने वाढणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्कतेची सूचना देण्यात आली आहे.
राज्यातील प्रमुख शहरांत सोमवारी नोंदविण्यात आलेले कमाल तापमानअंश सेल्सिअसमध्ये पुढीलप्रमाणे : पुणे 36.5, जळगाव 42, कोल्हापूर 35.2, महाबळेश्वर 30.8, नाशिक 36.1, सांगली 37.5, सातारा 36.7, सोलापूर 40.6, मुंबई 34.6, सांताक्रूझ 34.3, अलिबाग 37.1, रत्नागिरी 34.6, पणजी 35.5, डहाणू 36.2, परभणी 40.8, बीड 40.3, अकोला 42.8, अमरावती 43, बुलढाणा 38.5, ब्रह्मपुरी 42.4, चंद्रपूर 43, गोंदिया 41.5, वर्धा 43.1.








