पुणे / प्रतिनिधी :
नॅक मूल्यांकन प्रक्रियेत राज्याने पहिल्यांदाच देशात आघाडी घेतली आहे. राज्यातील 35 विद्यापीठे आणि 1 हजार 922 महाविद्यालये मिळून एकूण 1 हजार 957 उच्च शिक्षण संस्थांनी नॅक मूल्यांकन करून घेतल्याचे राष्ट्रीय मूल्यांकन आणि अधिस्वीकृती परिषदेच्या (नॅक) आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.
गुणवत्तापूर्ण उच्च शिक्षणासाठी विद्यापीठे, महाविद्यालये, उच्च शिक्षण संस्थांना नॅक मूल्यांकन आणि पूनर्मूल्यांकन पूर्ण करून घेणे अनिवार्य आहे. नॅक मूल्यांकनाच्या श्रेणीवरून महाविद्यालयाचा दर्जाही स्पष्ट होतो. मात्र, ही प्रक्रिया क्लिष्ट आणि वेळखाऊ असल्याने राज्यातील अनेक महाविद्यालयांकडून नॅक मूल्यांकनाकडे दुर्लक्ष होते. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या अनुषंगाने उच्च शिक्षण संस्थांच्या मूल्यांकन प्रक्रियेत काही महत्त्वपूर्ण बदल प्रस्तावित आहेत. मात्र, नवी पद्धती अस्तित्वात येईंपर्यंत नॅक मूल्यांकन प्रक्रिया बंधनकारक आहे. राज्यातील महाविद्यालये, विद्यापीठांनी नॅक मूल्यांकन करून घेण्यासाठी उच्च शिक्षण विभागाने सातत्याने पाठपुरावा केला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात या स्तरावर महाराष्ट्राने आघाडी घेतल्याचे दिसत आहे.
नॅकच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या मे 2023च्या आकडेवारीनुसार नॅक मूल्यांकन करून घेतलेल्या सर्वाधिक 1 हजार 957 उच्च शिक्षण संस्था महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्राखालोखाल कर्नाटकमधील 1 हजार 28 उच्च शिक्षण संस्थांनी नॅक मूल्यांकन करून घेतले आहे.