जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश जारी
बेळगाव : 1 नोंव्हेंबर रोजीच्या काळ्या दिनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाप्रशासनाने महाराष्ट्रातील तीन मंत्री व एका खासदाराला बेळगावात प्रवेशबंदीचा आदेश जारी केला आहे. मराठी आवाज दडपण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरूच असून या प्रयत्नांचाच एक भाग म्हणून महाराष्ट्रातील नेत्यांना बेळगावात प्रवेशबंदी आदेश जारी करण्यात आला आहे. सोमवारी रात्री जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी या संबंधीचा आदेश जारी केला आहे. महाराष्ट्राचे मंत्री शंभूराज देसाई, चंद्रकांतदादा पाटील, दीपक केसरकर व खासदार धैर्यशील माने या चार नेत्यांना मंगळवार 31 ऑक्टोबर सकाळी 6 पासून गुऊवारी दि. 2 नोव्हेंबर सांयकाळी 6 पर्यंत प्रवेशबंदीचा आदेश बजावला आहे.
1 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या राज्योत्सवादिवशी मराठी भाषिक काळादिन साजरा करतात. या कार्यक्रमात महाराष्ट्रातील नेते सहभागी होतात. त्यांच्या प्रक्षोभक भाषणांमुळे बेळगावात कायदा व सुव्यवस्था परिस्थितीला धक्का पोहोचण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील नेत्यांना बेळगावात प्रवेशबंदी करण्याची शिफारस पोलीस आयुक्तांनी सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. या शिफारशीवरून महाराष्ट्रातील नेत्यांना बेळगाव शहरात प्रवेशबंदीचा आदेश जारी करण्यात आला आहे. काळ्यादिनाच्या कार्यक्रमात भाग घेण्यासाठी येणाऱ्या महाराष्ट्रातील नेत्यांना कन्नड संघटना घेराव घालण्याची शक्यता आहे. कन्नड संघटना व म. ए. समितीच्या कार्यकर्त्यांत संघर्ष होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था परिस्थिती अबाधित ठेवण्यासाठी महाराष्ट्रीय नेत्यांना तीन दिवस बेळगावात प्रवेशबंदी केल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे.









