तणावपूर्ण वातावरण, महामार्गावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त : महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाकडून घोषणा

वार्ताहर /कोगनोळी
बेळगाव येथे महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महामेळाव्याच्या पार्श्वभूमीवर संयोजकांनी महाराष्ट्रातील नेतेमंडळींना आमंत्रण दिले होते. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे शिष्टमंडळ बेळगाव येथे होणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मेळाव्याला जाण्यासाठी पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील कोगनोळी (ता. निपाणी) येथील कर्नाटक-महाराष्ट्र आंतरराज्य सीमेवर आले असता कर्नाटक पोलिसांनी या शिष्टमंडळाला बेळगावमध्ये प्रवेश नाकारला असून त्यांना कोगनोळी सीमेवरच अडविण्यात आले. यावेळी पोलिसांनी सौम्य लाठीमार केल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. महाराष्ट्रातील नेते व पोलिसांमध्ये झालेल्या संघर्षाने पुन्हा एकदा आंतरराज्य वाहतूक काहीकाळ ठप्प होती.
यावेळी महाविकास आघाडीच्या वतीने बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, अशा घोषणांनी सारा परिसर दणाणून सोडला होता. कर्नाटक सीमेत प्रवेश करण्याच्या प्रयत्नामुळे या ठिकाणी काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. महाराष्ट्रातील नेतेमंडळी बेळगावमध्ये जाण्याच्या मागणीवर ठाम होते. मात्र कर्नाटक पोलिसांनी त्यांना कोणत्याही प्रकारचा प्रवेश दिला नाही. त्यामुळे कर्नाटक सरकारचा यावेळी घोषणांच्या माध्यमातून निषेध व्यक्त करण्यात आला.
कर्नाटक सरकारचे हिवाळी अधिवेशन व महाराष्ट्र एकीकरण समितीचा महामेळावा या पार्श्वभूमीवर रविवारपासूनच राष्ट्रीय महामार्गावरील कोगनोळी टोलनाक्मयावर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आज त्यामध्ये वाढ करून सकाळपासूनच महाराष्ट्रातील नेते कर्नाटकात येणार या उद्देशाने आणि त्यांना प्रवेशबंदी करण्यासाठी हजारो पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. याठिकाणी प्रत्येक वाहनांची कसून चौकशी करण्यात येत होती.
दूधगंगा नदीच्या पलीकडे महाराष्ट्रातील कागल हद्दीमध्ये महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते व महाराष्ट्राची पोलीस यंत्रणा सतर्क होती. सकाळी 11 वाजण्याच्या दरम्यान महाराष्ट्राचे माजी मंत्री व आमदार हसन मुश्रीफ, शिवसेना कोल्हापूर जिल्हाप्रमुख विजय देवणे यांच्यासह अन्य नेते व पदाधिकारी हे कर्नाटकात प्रवेश करीत होते. बेळगावातील महामेळाव्याला उपस्थित राहण्यासाठी प्रवेश करत असतानाच त्यांना दूधगंगा पुलावर मज्जाव करण्यात आला. यावेळी पोलीस व महाविकास आघाडीमध्ये बराच काळ संघर्ष सुरू होता. कर्नाटकच्या प्रशासनाने त्यांना रोखून आत प्रवेश दिला जाणार नाही, असा पवित्रा घेतला.
यावेळी आमदार हसन मुश्रीफ म्हणाले, 65 वर्षे मराठी भाषिक कर्नाटकात खिचपत पडले आहेत. 65 वर्षांपासून त्यांच्यावर अन्याय, अत्याचार होत आहेत. त्यांना मराठीत बोलायला दिलं जात नाही. मराठी पाट्या काढल्या जात आहेत. मराठी शाळा त्यांनी बंद केल्या आहेत. 865 गावात निवडणुकीमध्ये मराठी भाषिक ग्रा. पं. अध्यक्ष झाले आहेत. अनेकवेळा बेळगावचे महापौर देखील महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते झाले आहेत. खासदार, आमदार अनेकवेळा निवडून दिले आहेत. असं असताना कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई हे जाणीवपूर्वक वादंग करणारे वक्तव्य करीत आहेत. राज्यघटनेप्रमाणे आम्हाला देशात कुठेही जाण्याचा अधिकार दिलेला आहे. बेळगावात आपल्या मराठी भाषिकांचा महामेळावा होता आणि आम्ही त्यांना पाठिंबा देण्यासाठी चाललो होतो. अशा वेळेला आमची अडवणूक करणे हे निषेधार्थ आहे. त्यांचा मी जाहीर निषेध करतो.
शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे म्हणाले, मराठी भाषिकांना मदत करण्यासाठी, आम्ही सर्वजण महाविकास आघाडी म्हणून शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यावतीने कर्नाटकाचे कडे तोडून जाण्याचा प्रयत्न केलेला आहे. याठिकाणी कर्नाटकच्या पोलिसांनी आमच्यावर लाठीचार्ज केलेला आहे. लाठी उगारल्याबद्दल मी त्यांचा निषेध करतो.
याप्रसंगी प्रताप उर्फ भैय्या माने, सचिन चव्हाण, आर. के. पोवार, सुनिल मोदी यांच्यासह महाराष्ट्रातील सर्व पक्षाचे नेतेमंडळी, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी जिल्हा पोलीस प्रमुख संजीव पाटील, पोलीस उपाधीक्षक मनोजकुमार नाईक, बसवराज यलगार, मंडल पोलीस निरीक्षक संगमेश शिवयोगी, ग्रामीण पोलीस ठाण्याचे फौजदार अनिलकुमार कुंभार यांच्यासह अधिकारी व हजारो पोलीस कर्मचारी कार्यरत होते.









