पुणे / वार्ताहर :
नुकत्याच पुण्यात पार पडलेल्या ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धेत पंच म्हणून काम केलेल्या मारुती सातव यांना संग्राम कांबळे नावाच्या व्यक्तीने फाेन करुन धमकावल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी पंच मारुती सातव यांनी संग्राम कांबळे याच्या विराेधात काेथरुड पाेलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
पै.संदीप भाेंडवे यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक १० ते १४ जानेवारी दरम्यान काेथरुड येथे ६५ वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा झाली. या स्पर्धेत शेवटच्या दिवशी १४ जानेवारी राेजी सायंकाळी साडेपाच वाजता महाराष्ट्र केसरी गटातील उपांत्य फेरीत सिंकदर शेख विरुध्द महेंद्र गायकवाड ही कुस्ती झाली. या कुस्तीस मुख्य मंच म्हणून मारुती सातव काम पाहत हाेते. या कुस्तीत एका डावात महेंद्र गायकवाड या कुस्तीगीरास चार पाॅईंट देण्यात आले. याविरुध्द सिंकदर शेखच्या काेचने ज्युरी ऑफ अपील म्हणजे थर्ड अंपायरकडे दाद मागितली. त्यावेळी ज्युरी ऑफ अपील असलेले दिनेश गुंड, नवनाथ ढमाळ व अंकुश वरखडे यांनी अपील केलेल्या डावाचा व्हिडिओ पाहुुन सिंकदर शेख यास एक पाॅईंट व महेंद्र गायकवाड यास चार पाॅईंट दिले. या कुस्तीत सिंकदर शेख याचा पराभव झाला.
सिकंदर शेखवर अन्याय झाल्याचा आरोप करत त्या कुस्तीस असलेले पंच मारुती सातव यांना संग्राम कांबळे याने फोनवरून धमकी दिली. त्यामुळे जीवितास धाेका असल्याचे सांगत सातव यांनी स्पर्धा समिती आणि कोथरुड पोलिसात संग्राम कांबळेविरोधात तक्रार दाखल केली आहे.