प्रिन्स कोहलीकडून पुण्याचा पृथ्वीराज पाटील चितपट
पलूस: बांबवडे येथील कुस्ती मैदानात पुण्याचा महाराष्ट्र केसरी पै. पृथ्वीराज पाटीलला अवघ्या विसाव्या मिनिटात अमृतसरचा भारत केसरी पै. प्रिन्स कोहलीने पोकळ घिस्सा डावावर चितपट करून आस्मान दाखवले.
तुल्यबळ लढतीने प्रेक्षकांच्या डोळयाचे पारणे फिटले. पलूस तालुक्यातील बांबवडे येथे स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून उत्कर्ष कला क्रीडा मंडळ व ग्रामपंचायतीच्या वतीने कुस्ती मैदान भरवण्यात येते.प्रिन्स कोहली व पृथ्वीराज पाटील दोन्ही मल्ल एकमेकांना सरस ठरत होते.
सुरूवातीला पृथ्वीराजने दोनवेळा कब्जा घेण्याचा प्रयत्न केला.परंतु कोहली मोठया शिताफीने परतवून लावत होता. वीस मिनिटानंतर कोहलीने आक्रमक खेळी करीत पोकळ घिस्सा डावावर प्रतिस्पर्धी पृथ्वीराजला पराभूत करून पहिल्या बक्षिसाचा मानकरी ठरला.
दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती हरियाणा हिंदकेसरी रजत रूहल विरूध्द पुण्याचा वेताळ दादा शेळके यांच्यात अटीतटीची झाली. अवघ्या दुसऱ्या मिनिटांत दादा शेळकेने चलाखीने फ्रंटसालटो डाव टाकून रजतला अस्मान दाखवले.पंजाबचा गोल्ड मिडिलिस्ट हादी इराणी विरूध्द रविवराज चव्हाण यांच्यात झालेल्या लढतीत चव्हाण ढाक लावून मजबूत पकड करीत तो धुडकवून लावत होता.
दोन्ही मल्ल आक्रमक असल्याने ही कुस्ती सुमारे पंचवीस मिनिटे झाली.पंचांचा निर्णय अंतिम मानून त्याने काही वेळातच चव्हाणला बाहेरून टांग लावून कब्जात घेत विजय मिळवला.कोल्हापूरचा महाराष्ट्र चॅपियन कालीचरण सोलंकर खवासपूरचा कुमार महाराष्ट्र केसरी विक्रम भोसले यांच्यात जास्त वेळ कुस्ती चालली.प्रकाश बनकर विरूध्द हर्षद सदगीर यांच्यात झालेल्या लढतीत हर्षद सदगीर गुणावर विजयी झाला.
दुपारी दोन वाजता मान्यवरांच्या हस्ते पूजन करून मैदानास प्रारंभ झाला. खा. विशाल पाटील, माजी खा. संजयकाका पाटील, आमदार अरूण लाड, आमदार रोहीत पाटील, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, संग्रामसिंह देशमुख, शरद लाड, किरण लाड यांच्यासह ज्येष्ठ मल्लांनी मैदानास हजेरी लावली.








