पुणे / प्रतिनिधी :
महाराष्ट्रातील सर्वांत प्रतिष्ठेची आणि कुस्तीचा कुंभमेळा असणाऱ्या ‘महाराष्ट्र केसरी स्पर्धे’चा थरार 10 ते 14 जानेवारी 2023 या कालावधीत पुण्यात रंगणार आहे. या स्पर्धेच्या आयोजनाची संधी संस्कृती प्रतिष्ठानला मिळाली असून, कै. मामासाहेब मोहोळ क्रीडानगरी, किनारा हॉटेलजवळ, कोथरूड, पुणे येथे हा थरार अनुभवायला मिळणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष खासदार रामदास तडस व ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धेचे मुख्य संयोजक व संस्कृती प्रतिष्ठानचे संस्थापक माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या अस्थाई समितीचे चेअरमन संजय कुमार सिंह, माजी खासदार अशोक मोहोळ, पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष पै. संदीप भोंडवे, पुणे शहर राष्ट्रीय तालीम संघाचे अध्यक्ष पै. योगेश दोडके, पिंपरी-चिंचवड कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष पै. हनुमंत गावडे, पुणे शहर राष्ट्रीय तालीम संघाचे विश्वस्त पै. तात्यासाहेब भिंताडे, पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष विलास कथुरे आणि पदाधिकारी, कुस्तीगीर आदी उपस्थित होते.
मोहोळ म्हणाले, स्पर्धेचे उद्घाटन 10 जानेवारीला होणार आहे. उद्घाटन समारंभाला भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, ऑलिम्पिकपदक विजेते बजरंग पुनिया, योगेश्वर दत्त व साक्षी मलिक यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
समारोपाला शिंदे-फडणवीसांची उपस्थिती
समारोप व बक्षीस वितरणासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भारतीय कुस्तीगीर महासंघाचे अध्यक्ष खासदार ब्रिजभूषण सिंग आदी उपस्थित राहणार आहेत.
नामांकित 40 मल्लांचा सहभाग
तडस म्हणाले, अत्यंत चुरशीची समजल्या जाणाऱ्या ‘महाराष्ट्र केसरी’चे हे 65 वे वर्ष आहे. या स्पर्धेत खेळण्याचे प्रत्येक मल्लाचे स्वप्न असते. वर्षभर त्यासाठी मल्ल तयारी करत स्पर्धेची वाट पाहत असतात. यंदा ही स्पर्धा भव्य स्वरूपात होणार असून, सलग पाच दिवस या स्पर्धेचा थरार रंगणार आहे. राज्यभरातील मल्ल एकमेकांशी भिडणार आहेत. 47 तालीम संघातील 900 मल्ल या स्पर्धेत सहभागी होतील. यासह नामांकित 40 मल्लही सहभागी होणार आहेत. अतिशय रंजक अशा लढती पाहण्याची संधी व त्याचा फायदा आपल्या मल्लांना निश्चितच होणार आहे. त्याचबरोबरीने उदयोन्मुख खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कुस्त्या पाहण्याची संधी मिळणार आहे.
एकूण 900 कुस्तीगीर सहभागी होणार : कथुर
कथुरे म्हणाले, विविध दहा वजनी गटात, माती आणि गादी विभागात कुस्ती होईल. 900 कुस्तीगीर, 90 व्यवस्थापक, 90 मार्गदर्शक, 125 तांत्रिक अधिकारी, 90 पदाधिकारी सहभागी होणार आहेत.