;
माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या संस्कृती प्रतिष्ठानकडे यजमानपदाची धुरा
औंध प्रतिनिधी
यंदा महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा आखाडा कोठे रंगणार याची उत्सुकता संपली आहे. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या अस्थाई समितीने एकमताने पुण्यातील संस्कृती प्रतिष्ठानकडे यजमानपदाची धुरा सोपवली आहे. माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी याकरिता पुढाकार घेतला होता. डिसेंबर महिन्यात पुण्यात महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा थरार रंगणार आहे.
वरीष्ठ राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धा म्हणजेच महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा. ही कुस्ती क्षेत्रातील सर्वोच्च किताबाची स्पर्धा आहे. राज्यातील कुस्तीचा कुंभमेळा असे या स्पर्धेला संबोधले जाते. मानाची स्पर्धा कोठे होणार याबद्दल राज्यातील तमाम कुस्तीशौकीन आणि पैलवान यांना उत्कंठा लागलेली असते. मात्र पुणेकरांनी यंदा देखील यजमानपदाची बाजी मारली आहे. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी स्पर्धा आयोजनाची जबाबदारी खांद्यावर घेतली आहे.
पुणे (खराडी) येथे 17 वर्षाखालील राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाची निवड चाचणी आयोजित करण्यात आली होती. निवड चाचणीमध्ये महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या अस्थाई समितीचे अध्यक्ष संजय सिंग यांनी सर्वानुमते महाराष्ट्र केसरी स्पर्धा आयोजनाचे पत्र मुरलीधर मोहोळ यांना प्रदान करण्यात आले. यावेळी आण्णासाहेब पठारे, अर्जुनवीर काकासाहेब पवार, माजी आमदार बापुसाहेब पठारे, हनुमंत गावडे, विलास कथुरे, हिंदकेसरी योगेश दोडके , विजय बराटे, संदीपआप्पा भोंडवे, नामदेव बडरे, वैभव लांडगे, शंकर कंधारे, नामदेव लंगोटे, माऊली मांगडे, संदीप गरुड उपस्थित होते. खासदार रामदास तडस यांनी देखील या मुरलीधर मोहोळ यांनी आयोजनासाठी घेतलेल्या पुढाकाराबद्दल कौतुक केले आहे. स्पर्धेसाठी सर्वोतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही त्यांनी दिली आहे.