कोल्हापूर :
महाराष्ट्र–कर्नाटक एसटी बस सेवा सुरू करण्यापूर्वी आदर्श आचारसंहिता निश्चित केली जाणार आहे. त्यानंतर आढावा घेऊन परिस्थिती नियंत्रणात असल्यास बस वाहतूक सुरू केली जाईल. पुढील दोन दिवसांत याबाबतचा अंतिम निर्णय केला जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिली आहे. महाराष्ट्र–कर्नाटक बस सेवा पूर्ववत सुरू करण्याबाबत मंगळवारी कोल्हापूर आणि बेळगांव जिल्हा प्रशासनाच्या वरिष्ठ पातळीवर मंगळवारी व्हिडिओ कान्फरन्स घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते.
एसटीची मुंबई–बेंगलोर बस चित्रदूर्ग येथे अडवून बसच्या चालक आणि वाहक यांना धक्काबुक्की करण्यात आली. याचा निषेध करत महाराष्ट्रातून कर्नाटकातील एस.टी.बस वाहतूक बंद करण्यात आली. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी यासंदर्भातील आदेश दिले आहेत. यानंतर महाराष्ट्रातील विविध संघटनांनी कर्नाटकची बस राज्यात येऊ देणार नाही, असा पवित्रा घेतला. त्यामुळे कर्नाटकच्या बस देखील बंद करण्यात आल्या. गेल्या तीन दिवसांपासून महाराष्ट्र–कर्नाटक एसटी सेवा बंद आहे. दोन्ही राज्यातील प्रवाशांना याचा फटका बसू लागला आहे. नियमित वाहतूक, परीक्षा, यात्रा यावर याचा परिणाम होत असून दोन्ही राज्यातील प्रवाशांकडून बस वाहतूक सुरू करण्याची मागणी होत आहे.
यापार्श्वभूमीवर कोल्हापूर–बेळगांव जिल्हा प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची मंगळवारी व्हिडिओ कान्फरन्सद्वारे बैठक झाली. कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे, पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित, एस.टी.चे विभाग नियंत्रक शिवराज जाधव, विभागीय वाहतूक अधिकारी संतोष बोगरे, बेळगाव जिल्हाधिकारी मोहमद रोशन आदी उपस्थित होते. यामध्ये चित्रदूर्ग घटनेतील 8 जणांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती बेळगांव प्रशासनाने दिली.
दोन्ही राज्यातील प्रवाशांनी दिलेली निवेदनांवरही यावेळी चर्चा करण्यात आली. बस सेव सुरू करण्यासाठी दोन्ही राज्यांसाठी एक आदर्श आचारसंहिता निश्चित करण्याबाबत एकमत झाले. पुढील दोन दिवसांत परिस्थितीचा आढावा घेऊन पूर्ववत बस वाहतूक सुरू करण्याबाबत निर्णय झाला.
- कोगनोळीपर्यंत बस सेवा सुरू
प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून कोल्हापूर आणि बेळगांव बस सेवेकडून सोमवार 24 पासून कोगनोळी नाक्यापर्यत दोन्हीकडून बस सेवा सुरू केली आहे. मंगळवारी कोल्हापुरातून बसची संख्या वाढविण्यात आली आहे.
- वस्तीच्या बसला मिळणार पोलीस संरक्षण
चित्रदुर्ग येथे रात्रीच्यावेळीच चालकास मारहाणीचा प्रकार घडला होता. त्यामुळे दोन दिवसांत बस सेवा पूर्ववत झाल्यानंतर वस्तीच्या बससाठी पोलीस संरक्षण देण्याबाबतही यावेळी दोन्हीकडील पोलिस प्रशासनानी ग्वाही दिली आहे.








