लवकरच होणार अंमलबजावणी
कोल्हापूर प्रवीण देसाई
मिळकत पत्रिकेतील वारसा नोंदीसाठी आता घरबसल्या ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. भूमि अभिलेख विभागाकडून ऑनलाईन प्रणालीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. त्याची चाचणी सुरू असून नागरिकांचे काही अर्ज प्रातिनिधिक स्वरूपात भरून घेतले जात आहे. या प्रणालीत राहीलेल्या किरकोळ त्रुटी दुरूस्त करून लवकरच त्याची अंमलबजावणी होणार आहे. यामुळे नागरिकांना रांगेत थांबावे लागणार नसून त्यांचा वेळ व त्रासही वाचणार आहे.
वारस नोंदीच्या सध्या सुरू असलेली सर्वसाधारण प्रक्रिया अशी, संबंधिताला वारस नोंदीचा अर्ज हा भूमि अभिलेख कार्यालयात जारून भरावा लागतो. हा अर्ज भरून घेतल्यानंतर संबंधिताला कार्यालयाकडून जबाबासाठी बोलविले जाते. त्यानंतर संबंधिताला नोटीस पाठविली जाते, अशा स्वरूपाची ही एकंदरीत प्रक्रिया आहे. यामुळे वारसा नोंदीसाठी कार्यालयांमध्ये रांगाच्या रांगा हे चित्र नित्याचे आहे. तसेच या कार्यालयांमध्ये अर्ज सादर करण्यासाठी ठराविक व कमी कालावधि आहे. त्यामुळे नागरिकांचे हेलपाटे होरून त्यांना रिकाम्या हाताने परतावे लागण्याचे अनेक प्रकार झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर भूमि अभिलेख विभागाने ऑनलाईन प्रणाली सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार गेल्या काही महिन्यांपासून काम सुरू करण्यात आले आहे. या माध्यमातून नागरिकांना घरबसल्या ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. हा अर्ज योग्य असल्यास स्विकारला जाईल, तसेच अयोग्य असल्यास स्विकारला जाणार नाही. ही प्रक्रिया चार टप्प्यात असेल. प्रत्येक टप्प्यावर संबंधिताला पुढे काय करायचे याच्या सुचना असणार आहेत.
त्यानुसारच पुढील कार्यवाही करायची आहे. विशेष म्हणजे या ऑनलाईन प्रणालीत अर्ज मराठी भरण्याची सुविधा केली आहे. या प्रणालीचे काम अंतिम टप्प्या म्हणजे जवळपास संपत आले आहे. काही किरकोळ त्रुटी असून त्या दुरूस्त करून ही सुविधा लवकरच लोकांसाठी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी सध्या चाचणी सुरू आहे. यामध्ये नागरिकांचे अर्ज प्रातिनिधीक स्वरूपात भरून घेतले जात असून ते यशस्वीही होत आहेत. ही प्रणाली कार्यान्वित झाल्यास नागरिकांची मोठी गैरसोय टळणार आहे.
भूमि अभिलेख विभागाकडून वारसा नोंदीसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रणाली तयार केली आहे. त्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. सध्या या प्रणालीची चाचणी प्रक्रिया सुरू आहे. तसेच यामध्ये काही किरकोळ त्रुटीही आहेत. त्या दूर करून लवकरच ही प्रक्रिया लोकांसाठी सुरू करण्याचा प्रयत्न आहे. यामुळे नागरिकांची सोय होणार आहे.
-किरण माने, अधीक्षक, भूमी अभिलेख विभाग, करवीर