संग्राम काटकर,कोल्हापूर
मी कोल्हापुरातील वरिष्ठ फुटबॉल संघाचा खेळ पाहता आलो आहे.येथील अनेक खेळाडू राष्ट्रीय खेळाडूंच्या तोडीचे आहेत.या खेळाडूंमध्ये 10 ते 11 किलो मीटर इतके आंतर मैदानात चेंडूसोबत धावून खेळण्याची क्षमता आहे.हीच क्षमता आता 15 किलो मीटर आंतरापर्यंत वाढवणे आवश्यक आहे.त्यासाठी सामन्याच्या 90 मिनिटांचा विचार करुन सरावात बदल केल्यास तुल्यबळ खेळ केल्याचा आनंद मिळेल.योग्य खुराकासह पूर्ण विश्रांती घेतल्यास कोल्हापुरी खेळाडूंना उठवदार खेळ करण्यापासून कोणी रोखू शकणार नाही.संघांनीही खेळाडूंसाठी मसाजर,फिजिओथेरपिस्ट,डॉक्टर,टीम मिटिंग,जीमची व्यवस्था करुन संघांच्या दर्जा वाढवण्याचा गांभिर्याने विचार करावा,असे सांगताहेत खुद्द भारतीय फुटबॉल संघाचे माजी खेळाडू व महाराष्ट्र फुटबॉल संघाचे प्रशिक्षक स्टीव्हन डायस.
प्रतिष्ठेच्या संतोष करंडक फुटबॉल स्पर्धेतील ग्रुप-चार मधील साखळी सामने छत्रपती शाहू स्टेडियममध्ये झाले.या ग्रुप चारमधून साखळी सामने खेळलेल्या महाराष्ट्र राज्य संघाचे प्रशिक्षक म्हणून स्टीव्हन डायस हे कार्यरत होते.त्यांचे वैभवशाली कोल्हापुरी फुटबॉलच्या विकासाबाबतचे मत जाणून घेत असताना त्यांनी कोल्हापूरी संघांची प्रशंसा केली.ती करताना संघांनी आता रोजचा सराव, जुन्या सवयीत संघांनी आमुलाग्र बदल करावा लागेल,असेही सांगितले.कोल्हापुरी फुटबॉल संघ रोज सरावाच्या ठिकाणी एकत्र येऊन एक्झरसाईजसह करुन सराव सामना खेळतात.असे करणे चुकीचे आहे.संघांनी आयएसएल,आयलीग खेळणाऱ्या संघांप्रमाणे सराव करण्यावर लक्ष केंद्रीत करावे,यासंदर्भात त्यांनी दिलेली माहिती अशी…
फुटबॉल हंगाम सुरु होण्यापूर्वी काय करावे…
संघ बांधणी केल्यानंतर खेळाडूंकडून कसा सराव करुन घ्यावा,याचे व्यवस्थापनाने नियोजन करावे.मैदानात खेळताना खेळाडूंच्या पायात चेंडू तीन ते चार सेकंद असतो.त्याचा चाली करण्याच्या दृष्टीने अभ्यास करुन खेळाडू वन,टू टचनेच खेळतील अशा पद्धतीचा सराव करवून घ्यावा.खेळाडूंना एक आड एक दिवस जीममध्येही न्यावे.एक्झरसाईज,बॉलवर्क,फ्रींट मारण्याचाही सराव एक आड एकदिवसच करुन घ्यावा.खेळाडूंच्या फिटनेसचीही पाहणी सतत करावी.फुटबॉल हंगाम जवळ आला की जीम बंद करुन दिवसातून एकदा बॉलवर्कसह खेळाडूंचे दोन संघ तयार करुन सामना खेळवावा.
सामन्यानंतर चहा नको, फळे खा…
कोल्हापुरातील सर्वच संघ सामना खेळून झाल्यानंतर थेट चहाच्या गाडीकडे वळतात हे पूर्णतः चुकीचे आहे.सामन्यात खेळताना घामासोबत एनर्जी जात असते.अशा परिस्थितीत खेळाडूंनी चहा घेतल्यास विनाकारण पोटात साखर जाते.त्याचा दुष्परिणाम पुढील सामन्यावर होऊन खेळाडूंला पूर्ण क्षमतेने खेळण्यास अडचणी येतात.हे घडू नये,यासाठी सामना संपल्यानंतर पुढील काहीच मिनिटात नारळपाणीसह केळी,सफरचंद अथवा कोणतेही फळ खावे.असे केल्याने सामना खेळतेवेळी खर्च झालेल्या पॅलरीज व घटलेले वजन रिकव्हर होण्यास मदत होईल.
आईस बाथ करा थकवा घालवा…
90 मिनिटांचा फुटबॉल सामना खेळताना मैदानात 14 ते 15 किलो मीटर इतके आंतर मैदानात धावण्याची खेळाडूंमध्ये क्षमता असावी लागले.धावण्याने खेळाडूचे दीड ते अडीच किलोपर्यंत वजन घटत असते.त्यामुळे थकवा जाणवतो.हा थकवा दुर करण्यासाठी खेळाडूंनी मोठय़ा भांडय़ात पाणी घेऊन त्यात जास्तीत जास्त बर्फ टाकून गुडघा अथवा मांडीपर्यंत पाय सोडावेत.पाच मिनिटे असे केल्याने थकवा दुर होतो.शिवाय पुढील सामना पूर्ण क्षमतेने आपण खेळू शकतो,अशी ऊर्मी मनात निर्माण होते.
फिजिओथेरपिस्ट हवाच…
कोणत्याही परिस्थितीत संघांनी खेळाडूंसाठी फिजिओथेरपिस्ट ठेवणे गरजेचे आहे.फुटबॉल हंगामात सामना खेळतेवळी अनेक खेळाडूंना गुडघा,घोटा,पिंढरीवरील हाडाची दुखापत होत असते.या दुखापतीतून खेळाडूला लवकर बरे करण्यासाठी फिजिओथेरपिस्टच कामी येतो.फिजिओ करुनही दुखापत नियंत्रणात येत नसेल तर चांगले उपचार घेण्यासाठी डॉक्टरांकडे जाण्याचा सल्लाही योग्य प्रकारे फिजिओथेरपिस्टच देऊ शकतो.
म्हणून संघासाठी मसाजर हवा…
फुटबॉल हंगामात सातत्याने सराव करुन आणि सामने खेळून खेळाडूच्या अंगात लॅक्टीक ऍसिड तयार होते.हे ऍसिड खेळाडूच्या अंगात मोठा थकवा आणि आळस निर्माण करत असते.यातून खेळाडूंना बाहेर काढले गेले नाहीत,ते सामना खेळायचा म्हणून खेळतील,पण त्यात चांगला फरफॉर्मेंन्स करु शकणार नाहीत.हा प्रकार रोखण्यासाठी खेळाडूंचे गरजेनुसार मसाज होणे आवश्यक आहे.मसाज केल्याने शरिरातील लॅक्टीक ऍसिड नष्ट होऊ खेळाडू ताजेतवाने होतात.पूर्ण क्षमतेने सामने खेळू शकतात.
मोठी विश्रांती गरजेची…
मैदानातील सराव करुन अथवा सामना खेळून घरी परतल्यानंतर खेळाडूंनी विश्रांती घेणे आवश्यक आहे.मात्र विश्रांतीच्या नावाखाली मोठी झोप घेऊ नये.20 ते 25 मिनिटेच झोप घ्यायला हकरत नाही.जे कोणी झोपणार नाहीत,त्यांनी टीव्ही पहावा,वाचन करावे,म्युझिक ऐकावे,बेडवर पडून रहावे.खेळाडू जर नोकरी करत असले तर त्याने अंगाचे जास्ती हालचाल होईल,असे काम करु नये.
नकारात्मक विचार मनात आणू नका…
सामन्यात चांगली कामगिरी करायची असेल तर खेळाडूंनी मनात नकारात्मक विचार येऊ देऊ नयेत. हे विचार खेळावर वाईट परिणाम करतात. सामना खेळण्यासाठी आवश्यक असलेले टीम कॉम्बीनेशन बिघडून जाते. असे होऊ नये, यासाठी खेळाडूंना दंगा मस्ती करण्यास थोडी मुभा द्यावी. असे केल्याने खेळाडू हेल्दी राहून सामन्यात चांगला खेळ करु शकतात.
Previous Articleउद्योग वाढीसंदर्भात लवकरच राज्य व केंद्राची संयुक्त बैठक
Next Article कोरगावकर व्याख्यानमालेत आज प्रा. आनंद मेणसे









