श्रीराम मंदिर उद्घाटनाचा शुभेच्छा फलक हटविल्याने नाराजी
बेळगाव : अयोध्येतील श्रीराम मंदिराचे उद्घाटन 22 जानेवारी रोजी करण्यात येत आहे. त्या उद्घाटन कार्यक्रमाला शुभेच्छा देण्याचा फलक म. ए. समितीच्या रमाकांत कोंडुसकर यांनी कपिलेश्वरजवळ लावला होता. त्यावर मराठीत उल्लेख केल्यामुळे कावीळ झालेल्या महानगरपालिकेने तो फलक हटविला आहे. श्रीराम मंदिराच्या उद्घाटनासाठी शुभेच्छा देण्याचा फलक हटविल्यामुळे सीमाभागातून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून मराठी फलकांवर कारवाईचा बडगा महानगरपालिकेने उचलला आहे. लोकशाहीचा गळा घोटून हे कृत्य केले जात आहे. फलकावर 60 टक्के कन्नड आणि इतर भाषा वापरण्याचा आदेश कर्नाटक सरकारने बजावला आहे. त्यानंतर येथील काही मूठभर कन्नडिगांनी मराठी भाविकांविरोधात जोरदार आक्षेप घेण्यास सुरुवात केली. त्यानंतर महानगरपालिकेने मराठी फलकाविरोधात कारवाई करण्यास सुरुवात केली. श्रीराम मंदिराच्या उद्घाटनासाठी शुभेच्छा देण्याचा फलक कपिलेश्वरजवळ उभा करण्यात आला होता. त्यानंतर महानगरपालिकेने सायंकाळी तो फलक हटविला. यामुळे तीव्र संताप व्यक्त करण्यात येत असून अशा कार्यक्रमाला शुभेच्छा देतानाही फलकावर कारवाई केल्याने तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.









