ऑनलाईन टीम/तरुण भारत
राष्ट्रवादी कॉंग्रेसने आमच्या पाठीत सुरा खुपसला असा आरोप कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (nana patole) यांनी केला होता. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते, उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar)यांनी नाना पटोले यांच्या आरोपांना आज उत्तर दिलं आहे.
नाना पटोलेंच्या टीकेवर अजित पवारांना आज सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये खरपूस समाचार घेतला. “काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी एक वक्तव्य केलं की पाठीत खंजीर खुपसण्याचं काम केलं. वास्तविक नानांचं ते वक्तव्य हास्यास्पद वाटतं. कारण नानाच मागे कुठल्या पक्षातून काँग्रेसमध्ये आले ते तुम्हाला माहिती आहे. ते भाजपामध्ये होते. मग आता भाजपानं (BJP) म्हणायचं का की पाठीत खंजीर खुपसून ते तिकडे गेले. हे तेवढ्यापुरतं हेडलाईन मिळवण्यासाठी पाठीत खंजीर खुपसणं वगैरे वाक्य कदाचित त्यांना बरं वाटत असेल”, असं अजित पवार म्हणाले.
तसेच राज्य स्तरावर वेगळे निर्णय घेतले जातात. मात्र स्थानिक पातळीवर वेगळे निर्णय होत असतात. काँग्रेसला जसा पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे तसाच आम्हाला देखील आहे.’ अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली.
१९९९ ते २०१४ दरम्यान राज्यात आघाडीचं सरकार होतं. त्यावेळी देखील कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाने एकमेकांविरोधात निवडणुका लढवल्या होत्या, याची आठवण पवार यांनी करून दिली. झाकली मूठ सव्वा लाखाची असते असं सांगत अजित पवार म्हणाले की नाना पटोले काँग्रेस सोडून भाजप, मग भाजप सोडून काँग्रेसमध्ये दाखल झाले होते, हा इतिहास आहे.
गोंदिया जिल्हापरिषदेत राष्ट्रवादी कॉंग्रेसने भाजपशी हातमिळवणी करून सत्ता स्थापन केल्यामुळे कॉंग्रेसचे राज्य पातळीवरील नेतृत्व चांगलेत वैतागले आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडी धर्माचे पालन करत नसल्याचा आरोप केला जात आहे.








