भक्ती किल्लेदारला सुवर्णपदक
क्रीडा प्रतिनिधी/ पणजी
गोवा येथे सुरू असलेल्या 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत रविवारी पिंच्याक सिल्याट, जलतरण आणि वेटलिफ्टिंग या क्रीडा प्रकारांनी महाराष्ट्राची यशोपताका फडकवत ठेवली. पदकतालिकेत अग्रस्थानी कायम असलेल्या महाराष्ट्राने रविवारी 1 सुवर्ण, 4 रौप्य, 2 कांस्य अशा एकूण 7 पदकांची कमाई केली. महाराष्ट्राच्या खात्यावर आता 41 सुवर्ण, 25 रौप्य, 28 कांस्य अशी एकूण 94 पदकांची कमाई केली आहे. पिंच्याक सिल्याट क्रीडा प्रकारात भक्ती किल्लेदारने सुवर्ण पदक तसेच अनुज सरनाईक आणि ओमकार अभंग यांची रौप्यपदके पटकावली. महाराष्ट्राच्या खेळाडूंनी जलतरणाच्या पहिल्या दिवशी दोन रौप्य व एक कांस्य अशी तीन पदके जिंकून शानदार सलामी दिली. वेटलिफ्टिंगमध्ये अखेरच्या दिवशी महिलांच्या 87 किलो वजनी गटात महाराष्ट्राच्या योगिता खेडकरने कांस्य पदक पटकावले.
योगिता खेडकरला कांस्य पदक
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील वेटलिफ्टिंग क्रीडा प्रकाराच्या अखेरच्या दिवशी रविवारी महिलांच्या 87 किलो वजनी गटात महाराष्ट्राच्या योगिता खेडकरने कांस्य पदक पटकावले. योगिताने 89 किलो स्नॅच आणि 109 किलो क्लीन-जर्क असे एकूण 198 किलो वजन उचलून तिसरा क्रमांक पटकावला. उत्तर प्रदेशच्या पूर्णिमा पांडेने 105 किलो स्नॅच आणि 122 किलो क्लीन-जर्क असे एकूण 227 किलो वजन उचलत सुवर्ण पदक मिळवले. केरळच्या एनमारिया टी हिने 88 किलो स्नॅच आणि 118 किलो क्लीन-जर्क असे एकूण 206 किलो वजन उचलत रौप्य पदक प्राप्त केले. दरम्यान, महाराष्ट्राने वेटलिफ्टिंग क्रीडा प्रकारात यंदा तीन सुवर्ण, तीन रौप्य आणि तीन कांस्य अशी एकूण नऊ पदकांची कमाई केली आहे. अहमदाबादला गतवर्षी झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राने एक सुवर्ण आणि एक कांस्य अशी एकूण दोनच पदके मिळवली होती.
भक्तीला सुवर्ण पदक; अनुज, ओमकारला रौप्यपदके
भक्ती किल्लेदारचे सुवर्ण पदक तसेच अनुज सरनाईक आणि ओमकार अभंग यांची रौप्य पदके हे राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील पिंच्याक सिल्याट क्रीडा प्रकारातील महाराष्ट्राच्या कामगिरीचे वैशिष्ट्या ठरले. रविवारी पिंच्याक सिल्याटच्या अखेरच्या दिवशी महाराष्ट्राने एक सुवर्ण आणि दोन रौप्य पदकांची कमाई केली. पिंच्याक सिल्याटमधील महिलांच्या 85 ते 100 किलो ओपन-1 गटात महाराष्ट्राच्या भक्तीने अंतिम सामन्यात केरळच्या अथिरा एमएस हिचा पराभव केला. त्याआधी उपांत्य सामन्यात तिने उत्तर प्रदेशच्या शालिनी सिंगला नामोहरम केले. पुरुषांच्या 85 ते 90 किलो टँडिंग गटातील अंतिम फेरीत महाराष्ट्राच्या अनुजला मध्य प्रदेशच्या महेंद्र स्वामीकडून हार पत्करल्याने रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. पुरुषांच्या 70 ते 75 किलो टँडिंग गटाच्या सुवर्ण पदकाच्या लढतीत महाराष्ट्राच्या ओमकार दिल्लीच्या सूरज कुमारकडून पराभूत झाला. उपांत्य सामन्यात ओमकारने जम्मू काश्मीरच्या मोहम्मद इम्रानला धूळ चारली.
नवख्या खेळात एकूण 17 पदकांसह वर्चस्व
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत प्रथमच समावेश करण्यात आलेल्या पिंच्याक सिल्याट क्रीडा प्रकारात महाराष्ट्राने वर्चस्वपूर्ण कामगिरीचे प्रदर्शन करताना 7 सुवर्ण, 5 रौप्य, 5 कांस्य अशी एकूण 17 पदकांची लयलूट केली.
महाराष्ट्राची तीन पदकांची सलामी
महाराष्ट्राच्या खेळाडूंनी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील जलतरणाच्या पहिल्या दिवशी दोन रौप्य व एक कांस्य अशी तीन पदके जिंकून शानदार सलामी दिली. महाराष्ट्राचा आंतरराष्ट्रीय खेळाडू मिहीर आम्ब्रेने पुरुषांच्या 100 मीटर बटरफ्लाय शर्यतीत रौप्यपदक जिंकले. त्याने ही शर्यत 54.32 सेकंदात पार केली. केरळचा आंतरराष्ट्रीय खेळाडू साजन प्रकाशने या शर्यतीत सुवर्णपदक जिंकताना 53.78 सेकंद अशी वेळ नोंदवली. मिहीरने महाराष्ट्र रिले शर्यतीतही पदक मिळवून दिले. मित मखिजा, मिहीर, ऋषभ दास, वीरधवल खाडे यांचा समावेश असलेल्या महाराष्ट्राने पुरुषांच्या चार बाय 400 मीटर फ्री स्टाईल रिले शर्यतीत कांस्यपदक जिंकले. त्यांना हे अंतर पार करण्यास 3 मिनिट, 28.72 सेकंद वेळ लागला. या शर्यतीत कर्नाटक व तमिळनाडू संघांनी अनुक्रमे सुवर्ण व रौप्य पदक जिंकले.
महिलांच्या चार बाय 400 मीटर फ्री स्टाईल रिले शर्यतीत महाराष्ट्रास रौप्यपदक मिळाले. पलक जोशी, आदिती हेगडे, अवंतिका चव्हाण व ऋजुता खाडे यांचा समावेश असलेल्या महाराष्ट्र संघाने हे अंतर तीन मिनिटे 59.68 सेकंदात पार केले. कर्नाटक संघाने ही शर्यत तीन मिनिटे 59.53 सेकंदात पार केली.









