पार्थ पाटीलचा प्रेक्षणीय विजय, संतीबस्तवाड कुस्ती मैदान
बेळगाव : संतीबस्तवाड येथे बसवेश्वर व दुर्गादेवी यात्रोत्सवानिमित्त भव्य कुस्ती मैदानात कर्नाटक केसरी संगमेश्वर बिराजदारला पायाला दुखापत झाल्याने महाराष्ट्र चॅम्पियन बाळू अपराधला विजयी घोषित करण्यात आले. बेळगावच्या पार्थ पाटीलने इंद्रजित शेळकेला एकलांगीवरती पराभव करुन उपस्थित कुस्ती शौकिनांकडून वाहवा मिळविली. प्रमुख कुस्ती कर्नाटक केसरी संगमेश बिराजदार व महाराष्ट्र चॅम्पियन बाळू अपराध ही कुस्ती राहुल कल्लूर, अश्फाक ताशिलदार, बसाप्पा बिरमुत्ती, सातेरी कोकितकर, अॅड. प्रसाद सडेकर, भरमा बिरमुत्ती, यांच्या हस्ते लावण्यात आली. या कुस्तीत दुसऱ्या मिनिटाला बाळू अपराधने एकेरीपट काडून संगमेशला खाली घेतले. संकमेशला खाली घेवून घुटण्यावरती फिरविण्याचा प्रयत्न केला. पण संगमेशने त्यातून सुटका करुन घेतली. चौथ्या मिनिटाला संगमेशने एकेरीपट काढत बाळूला खाली घेत घिस्स्यावरती फिरविण्याचा प्रयत्न केला. पण बाळूने त्यातून सुटका करुन घेतली. 18 व्या मिनिटाला बाळूने दुहेरीपट काडून संकमेशवर ताबा मिळवित सवारी घालण्याचा प्रयत्न केला. पण त्यावेळी संगमेशच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याने बाळू अपराधला विजयी घोषीत करण्यात आले.

दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती कर्नाटक दसरा केसरी शिवय्या पुजेरी व सांगलीचा अक्षय चौगुले ही कुस्ती संतीबस्तवाड देवस्थान कमिटीतर्फे लावण्यात आली. या कुस्तीत दुसऱ्या मिनिटाला शिवय्याने दुहेरीपट काडून अक्षयला खाली घेतले व मानेचा कस काढून घुटण्यावर फिरविण्याचा प्रयत्न केला. पण घुटणा न व्यवस्थीत न लागल्याने अक्षयने त्यातून सुटका करुन घेतली. सातव्या मिनिटाला अक्षय चौगुलेने पायाला टाच मारुन शिवय्याला खाली घेत एकचाकवर फिरविण्याचा प्रयत्न केला. परंतु शिवय्या डोक्यावर फिरल्याने पुन्हा कुस्ती खडाखडी खेळविण्यात आली. बाराव्या मिनिटाला शिवय्या पुजेरीने एकेरीपट काडून पायाला एकलांगी भरली व नाकपट्टी लावून फिरविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी अक्षयला पायाला दुखापत झाल्याने शिवय्या पुजेरीला विजयी घोषित करण्यात आले. तिसऱ्या क्रमांकाच्या कुस्ती कर्नाटक चॅम्पियन पार्थ पाटील व सांगलीचा इंद्रजित शेळके ही कुस्ती कुस्तीगीर संघटनेतर्फे लावण्यात आली. दुसऱ्याच मिनिटाला पार्थने एकेरीपट काडून इंद्रजितला मोळी बांधण्याचा प्रयत्न केला. पण त्यातून इंद्रजितने सुटका करुन घेतली. पाचव्या मिनिटाला पार्थने आकडी लावून इंद्रजितला खाली घेत पायाला मजबूत एकलांगी बांधून एकलांगी डावावरती प्रेक्षणीय विजय मिळविला.

चौथ्या क्रमांकाच्या कुस्तीत प्रथमेश हट्टीकर-कंग्राळीने भिमाशी काटे याला झोळी डावावरती पराभूत केले. पाचव्या क्रमांकाची कुस्ती महेश बिर्जे-तीर्थकुंडये व राजू डागेकर ही कुस्ती डावप्रतिडावाने झुंजली. पण वेळेअभावी ही कुस्ती बरोबरीत सोडविण्यात आली. सहाव्या क्रमांकाच्या कुस्तीत पंकज चापगावने सुमित कडोलीला हप्ते डावावरती पराभव केले. सातव्या क्रमांकाच्या कुस्तीत दायानंद शिरगावने संभाजी काकतीला बॅकथ्रोवरती पराभव केले. आठव्या क्रमांकाच्या कुस्तीत विनायक येळ्ळूरने प्रवीण निलजीचा एकचाकवरती पराभव केला. नवव्या क्रमांकाच्या कुस्ती सुरज कडोली व रामदास काकती यांच्यात झाली. ही कुस्ती बरोबरीत राहिली. दहाव्या क्रमांकाच्या कुस्तीत सिद्धार्थ तीर्थकुंडयेने प्रल्हाद मुचंडीला ढाक डावारती पराभूत केले. कुबेर पिरनवाडीने-प्रज्वल कडोलीला निकाली डाव, महांतेश संतीबस्तवाडने केशव सांबराचा एकचाक डावावरती, शंकर तीर्थकुंडयेने रोहन कंग्राळीचा घिस्यावरती, रोहीत तीर्थकुंडयेने प्रज्वल गंगावेसचा मोळीवरती पराभव केला.
त्याच प्रमाणे अभी संतीबस्तवाड, ओमकार संतीबस्तवाड, नंदकुमार संतीबस्तवाड, दुर्गेश संतीबस्तवाड, रोहीत तीर्थकुंडये, बाळकृष्ण संतीबस्तवाड, नागेश संतीबस्तवाड, चाळाप्पा संतीबस्तवाड, विठ्ठल संतीबस्तवाड, पार्थ तीर्थकुंडये, आर्यन मच्छे यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर नेत्रदीपक विजय मिळविले. आकर्षक कुस्तीत मंजुनाथ संतीबस्तवाडने श्रेयस सातनाळे याला निकाली डावावरती पराभव केले. तर प्रज्वल मच्छे व करण खादरवाडी ही कुस्ती डावप्रतिडावाने झुंजली पण वेळेअभावी बरोबरीत राहिली. आखाड्याचे पंच म्हणून अतुल शिरोळे, लक्ष्मण बामणे, पिराजी मुचंडीकर, राजू कडोली, दुंडेश मेडकनट्टी, प्रकाश तुर्केवाडी-तीर्थकुंडये, बसवराज खानापुरे आदींनी काम पाहिले. प्रारंभी आखाड्याचे उद्घाटन अॅड. प्रसाद सडेकर व अश्फाक ताशिलदार यांनी केले. तर आखाड्याचे पूजन संतीबस्तवाड देवस्थान कमिटी यांच्या हस्ते करण्यात आले. कुस्तीचे समालोचन राजु मुंचडी पिरनवाडी व प्रकाश मजगावी यांनी केले, तर दिपक अवटे यळगुंड यांच्या सहकाऱ्यांने आपल्या हलगीच्या तालावर सर्व कुस्ती शौकिनांना खेळवून ठेवले.
भरमा बिरमुत्तीची भरमसाठ कामगिरी
गेले दोन ते तीन वर्षे हा आखाडा काही कारणास्तव भरविण्यात आला नव्हता. पण संतीबस्तवाडचे ज्येष्ठ पंच भरमा बिरमुत्ती यांनी स्वबळावर हे कुस्ती मैदान एकट्याने भरवून ते यशस्वी केले. असे मैदान एकट्याने भरविणे सोपे नाही. अनेक मैदाने भरविण्यासाठी कित्येक दिवस लागतात. पण यांनी न डगमगता हे मैदान यशस्वीपणे भरविले. याबद्दल संतीबस्तवाड व कुस्ती शौकिनांनी भरमा बिरमुत्तीचा खास गौरव केला.









