वृत्तसंस्था/ मुंबई
34 व्या किशोर/किशोरी गट राष्ट्रीय कब•ाr स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुलांचे आव्हान उपांत्यपूर्व फेरी, तर मुलींचे आव्हान उपउपांत्यपूर्व फेरीतच संपुष्टात आले. गया, बिहार येथील जी. डी. गोयंका पब्लिक स्कूल, रसलपूर येथील क्रीडांगणात मॅट वर झालेल्या उपांत्यपूर्व फेरीत गतविजेत्या हरियाणाने महाराष्ट्राचा प्रतिकार 51-40 असे संपविले. विश्रांतीपर्यंत अत्यंत चुरशीने खेळलेल्या या सामन्यात 29-22 अशी हरियाणाकडे आघाडी होती. विश्रांतीनंतर देखील सामना काही काळ चांगलाच रंगला. पण शेवटच्या काही मिनिटात तो हरियाणाच्या बाजूने झुकला. महाराष्ट्राचा बचाव आज अगदीच दुबळा ठरला. सारंग उंडे यांनी काही उत्कृष्ट चवडे काढत छान पकडी घेत सामन्यातील रंगत वाढविली. मनीष काळजे, तुकाराम दिवटे यांनी चढाईत गुण मिळवित सामन्यात परतण्याचा खूप प्रयत्न केला. पण महाराष्ट्राला ते पराभवापासून वाचविण्यात कमी पडले. मुलींच्या उपउपांत्यपूर्व सामन्यात उत्तर प्रदेशने महाराष्ट्राचे आव्हान 52-33 असे सहज मोडून काढले. बिदिशा सोनार, सेरेना म्हसकर यांचा खेळ या सामन्यात अगदीच सुमार ठरला.









