फिरोज मुलाणी/ कोरबा (छत्तीसगड)
कोरबा (छत्तीसगड) येथे 68 व्या राष्ट्रीय शालेय नेटबॉल स्पर्धेत महाराष्ट्राच्या 19 वर्षाखालील मुलांच्या संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत आंध्र प्रदेशचा 20-08 गुणांनी फडशा पाडत आपली विजयी आगेकूच कायम ठेवली. तसेच 14 वर्षांखालील मुलींच्या संघाने तामिळनाडूवर 15 गुणांनी मात केली. अतिशय चुरशीने सुरू असलेल्या स्पर्धेत राजस्थान, कर्नाटक, चंदीगड, पंजाब हरियाणा, दिल्ली यजमान छत्तीसगढच्या संघांनी साखळी सामन्यात वर्चस्व राखीत सुपर फेरीच्या दिशेने वाटचाल कायम राखली. संपूर्ण स्पर्धेत देशभरातील 23 राज्यातील 14 वर्षांखालील मुले-मुली आणि 19 वर्षांखालील मुले-मुलींचे संघ सहभागी झाले आहेत.
गुरुवारी सकाळच्या सत्रात महाराष्ट्राच्या 19 वर्षाखालील मुलांच्या संघाने तगड्या आंध्रप्रदेशचे आव्हान आपल्या सांघिक समन्वयाच्या बळावर मोडून काढले. भक्कम बचाव आणि उत्कृष्ट चाली रचत तब्बल महाराष्ट्राने वीस विरुद्ध आठ गुणांनी दणदणीत विजय मिळवला. 14 वर्षाखालील मुलांच्या गटात सुरुवातीला पराभव पत्करावा लागल्यानंतर दुसऱ्या सामन्यात मात्र सुरवातीला आघाडीवर असलेल्या झारखंडला मध्यतरानंतर बरोबरीत रोखले. साखळी फेरीतील तिसऱ्या सामन्यातील फेरीच्या विजयावर त्यांचे सुपर फेरीत पोहचण्याचे गणित अवलंबून असणार आहे.
याशिवाय, 14 वर्षांखालील मुलींच्या संघाने तामिळनाडूचा एकतर्फी पराभव केला. तर 19 वर्षाखालील मुलींच्या संघाला दिल्लीने सलामीला पराभवाचा धक्का दिला. रात्री उशिरापर्यंत प्रकाशझोत मैदानावर साखळी फेरीतील सामने सुरु होते. सुपर फेरीतील प्रवेशानंतर सामन्याचे वास्तव चित्र स्पष्ट होईल.
दिल्लीची दादागिरी
19 वर्षांखालील मुलींच्या सामन्यात अंपायरनी दिलेल्या चुकीच्या निर्णयामुळे दिल्लीच्या विजयाचा मार्ग मोकळा झाल्याची चर्चा महाराष्ट्राच्या खेळाडूंमध्ये सुरू होती. पंचांचे वर्तन, आणि चुकीचे निर्णय याबाबत महाराष्ट्र संघाचे प्रशिक्षक आणि संघ व्यवस्थापक यांनी नाराजी व्यक्त केली. याबाबत आयोजन कमिटीकडे दाद मागण्यासाठी अपिल केल्याचे सांगण्यात आले. आयोजकांच्या ढिसाळ नियोजनाचा फटका अनेक संघांना बसल्याने अनेक संघांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.









