राज्य शासनाने यंदाचा ‘महाराष्ट्र भूषण’ चतुरस्त्र अभिनेते अशोक सराफ यांना जाहीर केला आहे. या निर्णयाला थोडा उशीर झाला असला तरी या निर्णयावर राज्यातून आणि जगाच्या पाठीवर असलेल्या मराठी रसिकजनांकडून पसंतीची जी दाद मिळते आहे त्यातच निवडीचे सर्वसार आहे. ‘महाराष्ट्र भूषण’ हा महाराष्ट्रातील सर्वोच्च नागरी सन्मान आहे. 1996 पासून तो देण्यास प्रारंभ झाला. उद्योग, कला, क्रीडा, पत्रकारिता, लोकप्रशासन, विज्ञान, समाजसेवा, आरोग्यसेवा क्षेत्रात विशेष योगदान देणाऱ्या व्यक्तीस हा पुरस्कार दिला जातो. या पुरस्काराची प्रारंभी पाच लाख रूपये अशी रक्कम होती पण सन 2012 नंतर पुरस्काराच्या निकषांमध्ये बदल करुन प्रशस्तीपत्र, सन्मानचिन्ह, रोख 25 लाख रुपये असे या सन्मानाचे स्वरुप करण्यात आले. या पुरस्काराचे पहिले मानकरी विनोदी वाडमयकार महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व पु. ल. देशपांडे होते तर यंदाचे मानकरी विनोदी अभिनय सम्राट आणि चित्ररसिकांचे लाडके अशोक सराफ यांना मिळाला आहे. युती शासनाच्या काळात हा पुरस्कार सुरु झाला. नियमित दरवर्षी तो दिला गेला असे झालेले नाही. सन 2012 ते 2014 अशी सलग तीन वर्षे हा पुरस्कार कोणालाही जाहीर झाला नव्हता. पण या पुरस्काराचे मानकरी त्या-त्या क्षेत्रातले अव्वल, नामांकित आणि राज्याचे, देशाचे नाव उंचावणारे होते. गानसम्राज्ञी लता मंगेशकर, ज्येष्ठ शास्त्राrय गायक पंडित भीमसेन जोशी, ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा, महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, ज्येष्ठ कवी मंगेश पाडगावकर, ज्येष्ठ गायिका आशा भोसले, थोर समाजसेवक बाबा आमटे, शिवव्याख्याते बाबासाहेब पुरंदरे, ज्येष्ठ समाजसेवक अभय व राणी बंग अशी काही नावे या पुरस्काराचे मोठेपण अधोरेखित करण्यात पुरेशी आहेत. काही प्रसंगी या पुरस्काराच्या घोषणेनंतर टिका-टिप्पणी आणि पुरस्कार देण्यामागे राजकारण झाल्याच्या घटना आहेत तर गतवर्षी अप्पासाहेब धर्माधिकारी यांना पुरस्कार वितरणाचा जो समारंभ झाला त्यावेळी झालेली त्यांच्या अनुयायांची झालेली लाखोंची गर्दी व कडक उन, जास्तीच्या तापमान यामुळे उपस्थितांना झालेला त्रास, त्यामुळे घडलेली दुर्घटना यामुळे हा पुरस्कार चर्चेत आहेत. यंदा अशोक सराफ यांना त्यांच्या नाटक, चित्रपट आणि छोटा पडदा अर्थात दूरचित्रवाणी वरील केलेल्या चौफेर कामगिरीचा गौरव म्हणून हा पुरस्कार मुख्यमंत्री व पुरस्कार निवड समितीने जाहीर केला व त्यास पसंतीची सर्वस्तरातून मोठी दाद मिळते आहे. काल या पुरस्काराची घोषणा शासनाच्यावतीने करण्यात आली आणि पुरस्कार जाहीर होताच अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांनी आनंद तर व्यक्त केलाच पण दिलेली प्रतिक्रिया पुरेशी सूचक आहे. ते म्हणाले, माझ्या संमिश्र भावना आहेत. मला एवढ्या लवकर महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळेल असे वाटले नव्हते. आज मला दिग्गजांच्या पंक्तीला नेऊन बसवलंय. त्यामुळे मी निशब्द आहे. मी भारावलो आहे. काही चांगलं, वेगळं करायचं या जाणीवेने मी बांधलो गेलो आहे. मी निवडक काम करतो आहे. पण काम करत राहिन. मी तुमचा आहे आणि तुम्ही माझे. अशोक सराफ यांच्या सर्व भावना या प्रतिक्रियेत व्यक्त झाल्या आहेत. अनेक वेळा शब्दापेक्षा चेहरा बोलका असतो. उत्तम अभिनेता त्यांच्या अभिनयातूनच प्रथम बोलतो आणि मग डायलॉग येतात हे अशोक सराफ यांनी त्यांच्या अनेक गाजलेल्या भूमिकातून दाखवून दिले आहे. खरे तर असे सन्मान विजेते योग्य वयात दिले पाहिजेत. तसे दिले तर सन्मान विजेते अधिक बहरतील. उत्तम काम करतील. पण हाच नव्हे असे अनेक पुरस्कार देण्यास उशीर होत असतो. मग देर है दुरुस्त है म्हणण्याची वेळ येते. महाराष्ट्र ही नररत्नाची खाण आहे. अनेक क्षेत्रात चौफेर व उत्तुंग कामगिरी करणारी अनेक व्यक्तिमत्वे महाराष्ट्रातील आहेत. ‘भारतरत्न’च्या यादीवर नजर टाकली तरी हे स्पष्ट होईल. अशोक सराफ यांनी नुकतीच वयाची 75 वी पूर्ण केली. अभिनेता, हास्य अभिनेता, मराठीतील महानायक म्हणून त्यांचा गौरव होतो. त्यांचा जन्म व प्राथमिक शिक्षण मुंबईत चिखलवाडीत झाला. सत्तरच्या दशकात त्यांनी अभिनय क्षेत्रात पहिले पाऊल टाकले आणि या क्षेत्रात स्वत:चे असे खास स्थान निर्माण केले. सहज विनोद, चेहऱ्यावरील कमालीचे भाव, उत्तम टायमिंग ही अशोक सराफ यांची बलस्थाने आहेत. अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगावकर, महेश कोठारे यांनी एकापेक्षा एक असे विनोदी आणि विविध विषयांवर आधारित उत्तम चित्रपट देत मराठी चित्ररसिकांची जी सेवा केली त्याला तोड नाही. अशोक सराफ यांनी मराठी, हिंदी चित्रपट, नाटक आणि छोटा पडदा गाजवला आहे. विनोदवीर ते खलनायक आणि गंभीर व्यक्तिरेखापासून हलक्या-फुलक्या भूमिका त्यांनी सहजतेने पेलल्या आहेत. म्हणूनच अशोक सराफ रसिकांच्या गळ्यातील ताईत बनले आहेत. ‘कळत-नकळत, चौकटराजा अशी ही बनवाबनवी, धुमधडाका, नवरी मिळे नवऱ्याला, गंमतजंमत, आत्मविश्वास’ अशी भली मोठी यादी सांगता येईल. दामात-येस बॉस, करन अर्जुन, कोयला, जोडी नंबर एक अशा बॉलीवुडच्या चित्रपटातही अशोक सराफ यांची चमक दिसून आली आहे. सिंघममधील हेड कॉन्स्टेबल सावरकर ही छोटी भूमिका किंवा दादा कोंडके यांच्या तुमचं आमचं जमलं या चित्रपटातील म्हमद्या ही व्यक्तिरेखा आजही लोक विसरु शकत नाहीत. रंगभूमिवरही हमीदाबाईची कोठी, डार्लिंग डार्लिंग, सारखं छातीत दुखतंय, व्हॅक्युम क्लिनर, मनोमिलन अशी बहारदार नाटके साकारली आहेत. त्यांना फिल्मफेअर अॅवॉर्ड आणि मराठी चित्रपटसृष्टीचा जीवनगौरव लाभला आहे. अशोक सराफ यांच्या नावावर सुमारे 180 मराठी व्यक्तिरेखा तर 50 हून अधिक हिंदी चित्रपटातील वेगवेगळ्या भूमिका आहेत. रसिकांच्या मनावर त्यांनी कायम अधिराज्य गाजवलं आहे. त्यांनी मराठीला, मराठी साहित्य-कला क्षेत्राला आपल्या सर्वोत्कृष्ट अभिनयाने समृद्ध केले आहे. शहरी, ग्रामीण सर्वच रसिकांचे ते लाडके अभिनेते आहेत. लवकरच हा पुरस्कार नेत्रदीपक सोहळ्यात त्यांना प्रदान केला जाईल. महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल अशोक सराफ यांचे अभिनंदन आणि महाराष्ट्र भूषण अशोक सराफ यांना रसिकांच्या, वाचकांच्यावतीने मानाचा मुजरा.
Previous Articleअफगाणिस्तान – श्रीलंका कसोटी उद्यापासून
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.








