सातारा / दीपक प्रभावळकर :
आम्ही जगभरात मिरवतो की आम्ही ‘राजधानी सातारा’चे रहिवासी आहोत. पण आम्ही ‘राजधानी’ म्हणून राज्याला, राष्ट्राला काय नवीन दिलंय? आज राजधानीत म्हाताऱ्या कोताऱ्यांनी भर पावसात मोर्चा काढून डॉल्बीला विरोध केला. भले तुम्ही महाराज असा, खासदार असा, मंत्री असा पण किमान राजधानी साताऱ्याचे नागरिक तरी आहात ना? मग का नाही तुमच्या कानात हा आवाज जात? असो डॉल्बीमाफिया तुमचे कार्यकर्ते आहेत पण ही जनता सुद्धा तुमची आहे ना? तर हिम्मत दाखवून तुम्ही डॉल्बी आणि कर्णकर्कश आवाजाविरोधात आवाज उठवत? ही मागणी ज्येष्ठ नागरिकांची आहे.
उदयनराजे, शिवेंद्रराजे, शंभूराजे तुम्हीच तर सातारा शहराचे मालक आहात, राज्यभर डॉल्बी विरोधात आक्रोश सुरु आहे. आपल्या सातारा शहरात तर एक माणूस मेला, अकरा जण बहिरे झाले, कित्येक अपंग झाले.
म्हाताऱ्या कोताऱ्या लोकांनी डॉल्बी विरोधात मोर्चा काढला, ऐन पाऊस होता पण म्हातारे घाबरले नाहीत. डॉल्बीविरोधी त्यांचा आवाज तगडा राहिला.
ज्या पावसात भिजून शरद पवारांनी लोकसभा जिंकली त्या पावसाला तुम्ही कमी लेखत आहात.
- डॉल्बीमाफिया किती काळ ठेवून, सातारकरांचे जीव टांगणीला ठेवणार?
नेते, खासदार, आमदार, मंत्री म्हणून काम करताना तुमच्या अगली – बगलीला डॉल्बीमाफिया असणार आहेत. तेच तुमचे कार्यकर्ते आहेत पण तुमचे मतदाता किंवा जनता कोण? याचा पण विचार व्हावा, असं ही लोकांचे म्हणणे आहे.
- का नको राजधानी आदर्श बने?
महाराष्ट्रभर डॉल्बी विरोधी आंदोलन सुरु आहे, पुण्यात तर यावर जोरदार निदर्शने सुरु आहेत. मग अशावेळी ‘राजधानी’ म्हणून साताऱ्याने का पुढे येऊ नये? डॉल्बीला विरोध करून आपण का पुढे येऊ नये? उगाच आपण आमची भूमी क्रांतिकारी आहे असं म्हणून ऊर बडवण्यापेक्षा आपण स्वत: आपल्या भूमीची रक्षा करून डॉल्बी विरोधात एक नवी क्रांती निर्माण करूयात. का नको आपण राजधानीचा एक राज्य पॅटर्न बनवूयात?
- होय मानतो, वंदितो पण..
होय, आहात तुम्ही वंशज, आहात खासदार, मंत्री. होय आम्ही मानतो, वंदितो सुद्धा, मात्र असं नाही की ज्यांना वंदितो त्यांनी आमच्या म्हाताऱ्यांची सुद्धा व्यथा ऐकू नये? आम्ही आमचे आई-बाप ऐकू की तुमच्या डॉल्बीमाफियाचा धिंगाणा गपचूप मानू देत? अशी अपेक्षा साताऱ्याचे ज्येष्ठ नागरिक पांडुरंग दि. गाडे यांनी व्यक्त केलीय.
- डॉल्बीमुक्त सातारा ही चळवळ राज्यव्यापी व्हावी
सातारा जिह्यात चार मंत्री, दोन खासदार, दहा आमदार इतकी शक्ती असताना या लोकप्रतिनिधींना जर गोरगरीब आणि ज्येष्ठ नागरिक यांचा आक्रोश ऐकून डॉल्बीविरोधी आवाज काढता येत नसेल तर इथली जनता, दुर्भाग्यशाली आहे, असं मत काँग्रेस प्रवत्ते बाबुराव शिंदे यांनी व्यक्त केलं.
- नेत्यांनो पुढाकार घ्या
ही सारी विनंती श्री. छ. खा. उदयनराजे भोसले, श्री. छ. मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, पालकमंत्री शंभूराजे देसाई, मंत्री मकरंद आबा पाटील यांच्या संदर्भात आहे. त्यामुळे या लोकांनी पुढाकार घेऊन ‘डॉल्बीमुक्त सातारा’ आणि नंतर ‘डॉल्बीमुक्त महाराष्ट्र’ करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असं मत ज्येष्ठ नागरिक दिनानाथ मा. शिखरे यांनी मांडले आहे.








