हरे कृष्ण भक्तांमध्ये समाधान : बेळगाव तालुक्यासाठी अभिमानाची गोष्ट
वार्ताहर/किणये
आपल्या देशातील प्रयागराज या ठिकाणी सध्या होत असलेल्या कुंभमेळ्यात हरे कृष्णाचे भक्त रोज 70000 भाविकांसाठी महाप्रसाद बनवत आहेत. कुंभमेळ्यात ही सेवा त्यांना मिळाल्यामुळे त्या भक्तांना एक वेगळाच आनंद मिळाला आहे. तसेच ही बेळगाव तालुक्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. कुंभमेळ्यासाठी 144 वर्षानंतर चांगला योग आला आहे, असे ऋषीमुनींचे म्हणणे आहे. त्यामुळे यंदा होत असलेल्या कुंभमेळ्याला प्रचंड गर्दी झाली आहे. अनेक जण या कुंभमेळ्यात जाऊन त्रिवेणी संगममध्ये पवित्र स्नान करण्यासाठी उत्सुक आहेत. देशभरातून विविध ठिकाणाहून या त्रिवेणी संगम असलेल्या प्रयागराज येथे भक्त येत आहेत. हा एक आध्यात्मिक व धार्मिक सोहळा अनुभवताना दिसत आहेत. याच सोहळ्यात बेळगाव तालुक्यातील हरेकृष्ण भक्त असलेल्या 21 जणांना रोज 70 हजार भाविकांचा महाप्रसाद बनविण्याची संधी मिळालेली आहे. त्यांच्यावर ती जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे.
स्नान केल्यानंतर भक्ताला एक वेगळाच आनंद
हरे कृष्ण प्रचार केंद्र वाघवडे, खानापूर, निलजी, नंदगड, येळ्ळूर, धामणे, वडगाव व बेळगाव परिसरातील भक्तांचा या महाप्रसाद बनविण्याच्या कार्यामध्ये सहभाग आहे. प्रयागराज या ठिकाणी गंगा, यमुना व सरस्वती या तीन नद्यांचा संगम झालेला आहे. या ठिकाणी स्नान केल्यानंतर माणसाला एक वेगळाच आनंद मिळतो.
26 फेब्रुवारीपर्यंत प्रसाद बनविण्याचा उपक्रम
येत्या फेब्रुवारी महिन्याच्या 26 तारखेपर्यंत आपला हा महाप्रसाद बनविण्याचा उपक्रम सुरूच राहणार आहे. असे हरेकृष्ण प्रचार केंद्र वाघवडे येथील काही भक्तांनी सांगितले आहे.









