4 महिन्यात होवू घातलेल्या निवडणूकीसाठी लवकरच अधिसुचना निघण्याची शक्यता
सांगली : जवळपास पावणेदोन सर्वच प्रभागात इच्छुकांची भाऊगर्दी, बंडखोरी अटळ वर्षाच्या कालावधीनंतर सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे. आगामी तीन चार महिन्यात होवू घातलेल्या निवडणूकीसाठी पुढील महिन्यात अधिसुचना निघण्याची शक्यता आहे. दिवाळीच्या अगोदर वा नंतर लगेचच ही निवडणूक होण्याची शक्यता आहे.
यामुळे पालिका निवडणूकीचे वेध लागलेल्या माजी नगरसेवक व इच्छुकांनी आत्तापासूनच गुडघ्याला बाशिंग बांधून ठेवले आहे. तिकीट वाटपात बंडखोरी होणार हे नेतेमंडळींनाही माहित असल्याने त्यांनी आत्ताच कोणतेही पत्ते खुले केलेले नाहीत. पण पालिकेची निवडणूक रंगतदार होणार हे मात्र निश्चित आहे.
मनपाची निवडणूक महायुती विरूध्द महाआघाडी अशी रंगण्याची शक्यता आहे. चार सदस्यीय प्रभागातून प्रत्येकी चार चार नगसेवक निवडून जाणार आहेत. मनपा क्षेत्रातील २० प्रभागातून सध्याच्या ७८ संख्येत वाढ होवून लोकसंख्येच्या प्रमाणात ८५ ते ९० नगरसेवक महापालिकेवर निवडून जाणार आहेत.
प्रभागातून आपल्यालाच तिकीट मिळावे यासाठी इच्छुकांचे प्रयत्न असल्याने सर्व इच्छुकांना तिकीटे देणे शक्य होणार नाही. यामुळे महायुती व महाविकास आघाडी अशा दोन्हीकडील नेतेमंडळींचा तिकीट वाटपात कस लागणार आहे. इच्छुकांच्या वाढत्या संख्येमुळे सर्वच प्रभागात बंडखोरी अटळ असल्याचे सांगण्यात येते. महापालिकेची यापुर्वी २०१८ ला शेवटची निवडणूक झाली होती. ऑगस्ट २०२३ ला पालिकेची मुदत
संपल्याने मनपाचा कारभार प्रशासकांच्या हातात गेला. आयुक्त सत्यम गांधी हे प्रशासक म्हणून काम पाहत आहेत. सर्वोच्च न्यायालायच्या आदेशाने निवडणूका होणार आहेत. २०१८च्या निवडणूकीत झालेल्या पालिकेच्या निवडणूकीत सांगलीतून दहा, मिरजेतून सात व कुपवाडमधील तीन अशा २० प्रभागातून ७८ नगरसेवक निवडून गेले होते. यंदा लोकसंख्यावाढीमुळे नगरसेवकांच्या संख्येत किमान सात ते जास्तीत जास्त १२ इतकी वाढ होण्याची शक्यता आहे.
प्रभाग रचना झाल्यावर याबाबतचे चित्र स्पष्ट होईल. मनपाच्या निवडणूकीत इच्छुकांची संख्या मोठया प्रमाणात राहणार आहे. महायुती म्हणून भाजपा, राष्ट्रवादी अजित पवार आणि शिंदेची शिवसेना तर महाविकास आघाडीकडून काँग्रेस, शरदचंद्र पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस व उध्दव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना अशी प्रत्येकी तीन तीन पक्ष दोन्हीकडच्या आघाडीत असतील.
याशिवाय मनसे, जनता दल, रिपाई, एमआयएम, बसपा, समाजवादी पक्ष, संभाजी बिग्रेड आणि अपक्षांची संख्या मोठी असेल. सुमारे सात वर्षाच्या कालावधीनंतर पालिकेची निवडणूक होत असल्याने प्रत्येक प्रभागातील इच्छुकांची संख्या बरीच राहणार आहे. महायुती आणि महाविकासआघाडी अशा दोन्ही बाजूने इच्छुकांच्या वाढत्या संख्येमुळे तिकीट मिळाले नाही तर अपक्ष म्हणून मैदानात उतरण्याचा निर्णय अनेकजण घेण्याची शक्यता आहे.
बंडखोरी नवीन नाही
मनपाच्या राजकारणात बंडखोरी नवीन नाही. यापुर्वीच्या सर्वच निवडणूकांमध्ये जवळजवळ सर्वच पक्षामध्ये बंडखोरी झालेली आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणूकीत तिकीट वाटपात नेत्यांचा कस लागणार आहे. तिकीट कोणाला द्यायचे याची चिंता नेत्यांना आत्तापासूनच लागून राहिली आहे. प्रभागातील सदस्य संख्या आणि त्यात पुन्हा आरक्षणे काय पडणार यावर बरीचशी गणिते अवलंबून असतील.
आरक्षणात अनेकांची वांडी उडण्याची शक्यता आहे. त्याबाबतही इच्छुकांच्या मनात धाकधुक कायम आहे. पण या ना त्या आजूबाजूच्या दोन तीन प्रभागावर लक्ष ठेवून असलेल्या इच्छुक व माजी नगरसेवकांनी प्रसंगी बंडखोरीचीही तयारी ठेवली आहे.








