इजाज कुरेशी मालिकावीर व सामनावीर : अप्पा संघ उपविजेता
बेळगाव : मराठा स्पोर्ट्स क्लब आयोजित महांतेश कवटगीमठ चषक निमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धेचे अंतिम सामन्यात आकर्षक फटकेबाजीच्या व उत्कृष्ट गोलंदाजी जोरावर प्रथमेश मोरे संघाने आप्पा संघाचा 4 गड्यांनी पराभव करुन महांतेश कवटगीमठ चषक पटकावित 2 लाखांचे बक्षीस मिळविले. इजाज कुरेशीला ‘सामनावीर’ व ‘मालिकावीर’ असा दुहेरी मुकुट मिळाला आणि त्याला बक्षीसा दाखल दुचाकी वाहनही देण्यात आले. रविवारी खेळविण्यात आलेल्या अंतिम सामन्यात प्रथमेश मोरे संघाने नेणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. पहिल्या डावात खेळताना आप्पा स्पोर्ट्सने 8 षटकात 5 गडी बाद 91 धावा केल्या. त्यात प्रथमेश राठोडने 1 षटकार, 2 चौकारांसह 31 तर कृष्णा पवारने 2 षटकार, 4 चौकारांसह 33 धावा केल्या. प्रथमेश मोरेतर्फे अक्षय पाटीलने 2 गडी बाद केले. पहिल्या डावात प्रत्युत्तरादाखल खेळताना प्रथमेश मोरे संघाने 8 षटकात 5 गडी बाद 95 धावा करुन पहिल्या डावात 4 धावांची आघाडी मिळविली. त्यात इजाज कुरेशीने 1 षटकार, 6 चौकारांसह 25 चेंडूत आक्रमक 46 धावा केल्या. आप्पा स्पोर्ट्सतर्फे राज सिंग व प्रथमेश राठोड यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
दुसऱ्या डावात 4 धावांचे लिड घेऊन खेळताना 8 षटकात 6 गडी बाद 76 धावा केल्या. प्रथमेश पवारने 2 चौकारांसह 24, प्रथमेश राठोडने 14 व प्रथमेश बेलचिडाने 15 धावा केल्या. प्रथमेश मोरेतर्फे अक्षय पाटीलने 21 धावात 4 तर बिलाल शेखने 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना प्रथमेश मोरे संघाने 6.2 षटकात 6 गडी बाद 73 धावा करुन सामना 4 गड्यांनी जिंकला. त्यात इजाज कुरेशिने 2 षटकार, 2 चौकारांसह 25, गौस शेखने 14 धावा केल्या. आप्पातर्फे आर्यनने 2 गडी बाद केले. सामन्यानंतर प्रमुख पाहुणे महापौर सविता कांबळे, उपमहापौर आनंद चव्हाण, पुरस्कर्ते महांतेश कवटगीमठ, शरद कवटगीमठसह इतर मान्यवरांच्या हस्ते विजेत्या प्रथमेश मोरे संघाला आकर्षक चषक व 2,01,111 रु. तर उपविजेत्या आप्पा स्पोर्ट्सला 1,01,111 रु. व चषक देऊन गौरविण्यात आले. अंतिम सामन्यातील सामनावीर इजाज कुरेशी, उत्कृष्ट फलंदाज रजत कुडलकर (केआर शेट्टी), उत्कृष्ट गोलंदाज राजसिंग (अप्पा स्पोर्ट्स), उत्कृष्ट संघ बंगाली टायगर्स यांना चषक व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. तर अमर अकनोजी यांनी पुरस्कृत केलेले दुचाकी वाहन मालिकावीर इजाज कुरेशीला देण्यात आले. अक्षय कोलंबेकर, प्रतीक राऊत, सलीम कोतवडेकर (तिघेही रत्नागिरी) यांनी पंचांची भूमीका बजावली. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मराठा स्पोर्ट्सच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.









