श्री रामजन्मभूमी तीर्थ ट्रस्टचे अध्यक्ष : लखनौमध्ये उपचार
लखनौ / वृत्तसंस्था
श्री रामजन्मभूमी तीर्थ ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्य गोपालदास यांची प्रकृती शुक्रवारी रात्री अचानक बिघडली. त्यांना लखनौच्या मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू असल्याचे शनिवारी मेदांता प्रशासनाने मेडिकल बुलेटिनद्वारे स्पष्ट केले. मूत्रसंसर्गाचा त्रास आणि अशक्तपणाच्या तक्रारींमुळे महंतांना इस्पितळात दाखल करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. दिलीप दुबे आणि त्यांची सहकारी टीम महंत यांच्यावर उपचार करत असल्याचे मेदांता लखनौचे संचालक प्रोफेसर राकेश कपूर यांनी सांगितले.
महंत नृत्य गोपाल दास यांची प्रकृती यापूर्वी एप्रिल महिन्यातही खालावली होती. त्यावेळीही त्यांना मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच्या किडनीमध्ये इन्फेक्शन झाले होते. महंत यांना क्रॉनिक रीनल फेल्युअरचा त्रास वारंवार होत आहे. तसेच त्यांना युरिनरी ट्रक्ट इन्फेक्शन म्हणजेच यूटीआयचही त्रास वारंवार होत असतो. या आजारात मूत्रमार्गात संसर्ग झाल्यामुळे मूत्रपिंड, मूत्राशय आणि इतर अनेक ठिकाणी परिणाम संभवतो.









