मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत निर्धार : 11 जणांच्या समितीची निवड; गावोगावी जागृती करणार
बेळगाव : सीमाभागातील मराठी भाषिकांना डिवचण्यासाठी कर्नाटक सरकारकडून बेळगावमध्ये कर्नाटक विधिमंडळाचे अधिवेशन भरविले जाते. यावर्षी सोमवार दि. 4 डिसेंबरपासून अधिवेशन होणार असून प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही मराठी भाषिक आपले प्रतिअधिवेशन भरवून मराठी भाषिकांची एकी दर्शविणार आहेत. परवानगी मिळाली नाही तरी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी महामेळावा यशस्वी करणारच, असा निर्धार मध्यवर्ती म. ए. समितीच्या बैठकीत करण्यात आला. बुधवारी मराठा मंदिर येथे झालेल्या बैठकीत महामेळाव्यासह विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. अॅड. राजाभाऊ पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. महामेळावा यशस्वी करण्यासाठी बेळगाव शहर, तालुका तसेच खानापूर तालुक्यातील मध्यवर्तीच्या सदस्यांपैकी 11 सदस्यांची निवड करण्यात आली आहे. हे सदस्य महामेळावा यशस्वी करण्यासाठी दिशा ठरवणार आहेत. यामध्ये माजी आमदार मनोहर किणेकर, अॅड. एम. जी. पाटील, राजाभाऊ पाटील, प्रकाश मरगाळे, मालोजी अष्टेकर, रणजित चव्हाण-पाटील, बी. ओ. येतोजी, गोपाळ देसाई, गोपाळ पाटील, मुरलीधर पाटील, निरंजन सरदेसाई यांची समितीमध्ये निवड केली आहे.
खजिनदार प्रकाश मरगाळे म्हणाले, महाराष्ट्र सरकारला सीमावासियांची जाणीव करून देण्यासाठी पत्र पाठविण्यात आले होते. महाराष्ट्र सरकारकडून सीमाभागातील नागरिकांसाठी योजना जाहीर करण्यात आल्या. परंतु, कोणत्या योजनेसाठी कोणत्या विभागाकडे अर्ज करावा, याबाबत स्पष्टता नाही. तसेच रखडलेले कोर्टाचे कामकाज, सीमाकक्षासाठी अधिकाऱ्यांची कमतरता व विविध विषयांवर महाराष्ट्र सरकारला जाग आणण्यासाठी पत्र लिहिल्याचे त्यांनी सांगितले. खानापूर म. ए. समितीचे अध्यक्ष गोपाळ देसाई यांनी महामेळाव्यासाठी खानापूर तालुक्यात जागृती करणार असल्याचे सांगितले. अॅड. एम. जी. पाटील म्हणाले, महाराष्ट्रातील नेत्यांनी कर्नाटक सरकारचा विरोध झुगारून महामेळाव्याला उपस्थिती दर्शवावी. जरी महाराष्ट्रातील नेते आले नाहीत तरी स्थानिक नेत्यांना घेऊन महामेळावा यशस्वी करण्याचा निर्धार त्यांनी केला. मनोहर किणेकर यांनी तालुक्यात गावोगावी जागृती करणार असल्याचे सांगितले. सरचिटणीस मालोजी अष्टेकर यांनी महामेळाव्याची पार्श्वभूमी सर्वांसमोर सांगितली. यावेळी मध्यवर्तीचे सदस्य उपस्थित होते.









