महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांचा निर्धार : महाराष्ट्रातील नेत्यांना निमंत्रण
बेळगाव : मराठी भाषिकांना डिवचण्यासाठी बेळगावमध्ये कर्नाटक विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन भरविले जाते. याला प्रत्युत्तर देण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीने सोमवार दि. 9 रोजी मराठी भाषिकांच्या महामेळाव्याचे आयोजन केले आहे. अधिवेशनाला प्रतिमहामेळावा घेऊन प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. सकाळी 11 वाजता धर्मवीर संभाजी चौक येथे महामेळावा होणार असल्याने महाराष्ट्र एकीकरण समितीने महामेळावा यशस्वी करण्याचा निर्धार केला आहे. मध्यवर्ती म. ए. समितीच्या आदेशानुसार मागील महिनाभरापासून महामेळाव्याच्या जागृतीसाठी घटक समित्यांच्या बैठका झाल्या. मराठी भाषिकांच्या न्याय व हक्कासाठी महामेळावा होणे गरजेचे असल्याचे मत कार्यकर्त्यांनी व्यक्त केले होते. त्यामुळे महामेळाव्याला परवानगी मिळो अथवा न मिळो पोलिसांचा कोणताही विचार न करता यावर्षी महामेळावा यशस्वी करणारच, असा निर्धार करण्यात आला होता. महामेळाव्यासाठी म. ए. समितीने पोलिसांसमोर अनेक पर्याय दिले होते. अखेर धर्मवीर संभाजी चौक येथे महामेळावा होणार असल्याचे म. ए. समितीने घोषित केले.
महाराष्ट्रातील नेत्यांना निमंत्रण
मागील 67 वर्षांपासून सीमाभागातील नागरिकांची महाराष्ट्रात जाण्याची इच्छा अजून अपूर्ण आहे. आपल्या भाषेच्या राज्यामध्ये जाण्यासाठी हा लढा सुरू आहे. या लढ्याचाच एक भाग म्हणून दरवर्षी महामेळावा आयोजित केला जातो. यावर्षी देखील महाराष्ट्रातील सर्वपक्षीय नेत्यांना म. ए. समितीने निमंत्रण दिले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील कोणत्या पक्षाचे लोकप्रतिनिधी महामेळाव्याला उपस्थित राहतात, हे पहावे लागणार आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कोल्हापूरमधील नेत्यांनी महामेळाव्याला उपस्थित राहणार, असे जाहीर केले आहे. मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी रविवारी सकाळी व्हॅक्सिन डेपो परिसराला भेट दिली. मागील अनेक वर्षांपासून व्हॅक्सिन डेपो मैदानावर महामेळाव्याचे आयोजन केले जात होते. परंतु, मागील दोन वर्षांपासून पोलिसांनी कायदा व सुव्यवस्थेचे कारण देत महामेळाव्याला आडकाठी घालण्याचा प्रयत्न केला. म. ए. समितीने व्हॅक्सिन डेपोसह इतर काही ठिकाणी महामेळाव्यासाठी परवानगी मागितली होती. या पार्श्वभूमीवर रविवारी काही पदाधिकाऱ्यांनी व्हॅक्सिन डेपो परिसराला भेट दिली. मध्यवर्ती म. ए. समितीचे खजिनदार प्रकाश मरगाळे, माजी आमदार मनोहर किणेकर, रणजित चव्हाण-पाटील, रामचंद्र मोदगेकर यांच्यासह इतर सदस्य उपस्थित होते.
महामेळाव्याच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त
महाराष्ट्र एकीकरण समितीने जिल्हाधिकारी तसेच पोलीस आयुक्तांना परवानगीचे रितसर पत्र पाठविले होते. परंतु, मराठी भाषिकांची वाढती ताकद पाहून त्यांना थोपविण्यासाठी पोलिसांकडून दडपशाहीचे धोरण राबविले जात आहे. धर्मवीर संभाजी चौक येथे महामेळावा होणार असल्याने रविवारी सकाळपासून या ठिकाणी बॅरिकेड्स तसेच पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्याचबरोबर व्हॅक्सिन डेपो येथेही पोलीस तैनात करण्यात आले होते.









