मोठ्या संख्येने उपस्थित रहाण्याचे शहर म. ए. समितीचे आवाहन
प्रतिनिधी/ बेळगाव
कर्नाटक विधिमंडळाच्या अधिवेशनाला विरोध दर्शविण्यासाठी मराठी भाषिक अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी भव्य महामेळावा आयोजित करून आपले प्रति अधिवेशन भरवितात. यावर्षी सोमवार दि. 19 रोजी व्हॅक्सिन डेपो मैदान परिसरात भव्य महामेळावा होणार असून, यासाठी महाराष्ट्रातील नेत्यांना निमंत्रण देण्यात आले आहे. रस्त्यावरची लढाई हा सीमालढ्याचा भाग असल्याने प्रत्येक मराठी भाषिक महामेळाव्यात सहभागी होण्याचा निर्धार शहर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत करण्यात आला.
बुधवारी रामलिंगखिंड गल्ली येथील रंगुबाई भोसले पॅलेस येथे बैठक पार पडली. महामेळाव्यासाठी अवघे चार दिवस शिल्लक राहिले असल्याने जागृती करण्यासाठी प्रत्येक विभागात, गल्लोगल्ली बैठका घेण्याचे आवाहन करण्यात आले. महामेळाव्यातून मराठी भाषेविषयीची अस्मिता व होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडली जाणार आहे. यावेळीच्या महामेळाव्याकडे राज्यासह संपूर्ण देशाचे लक्ष लागले असल्याने मोठ्या संख्येने मराठी भाषिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कर्नाटक सरकार नेहमीच सीमाप्रश्न संपला अशी वल्गना करीत होते. परंतु याच सीमाप्रश्नासाठी थेट देशाच्या गृहमंत्र्यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना दिल्ली येथे बोलाविले आहे. सीमाप्रश्नासंबंधीत हालचाली गतिमान असल्याने प्रत्येकाने या लढ्याला एकजुटीने बळ देणे आवश्यक असल्याचे मत कार्यकर्त्यांनी व्यक्त केले.
यावेळी प्रकाश मरगाळे, मालोजी अष्टेकर, बाबू कोले, शिवराज पाटील, श्रीकांत कदम, नगरसेवक शिवाजी मंडोळकर, सचिन केळवेकर, बसवाणी कुरंगी, रामचंद्र जाधव, मारुती अनगोळकर, महादेव मंगणाकर, श्रीकांत मांडेकर, संजय चौगुले, शशिकांत सडेकर, नितीन खन्नूकर, मोतेश बार्देशकर, अंकुश केसरकर, राकेश पलंगे, शांताराम होसूरकर, गजानन नावगेकर, राहुल पाटील यासह इतर सदस्य उपस्थित होते.









