सैन्याचे वाहन दरीत कोसळले : आज पार्थिव गावात दाखल होणार
वार्ताहर/ जमखंडी
जम्मू काश्मीरच्या पुंछ जिह्यात सैन्याचे वाहन दरीत कोसळून पाच सैनिकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. त्यातील कर्नाटक राज्यातील तीन जवानांचा समावेश आहे. त्यापैकी एक बागलकोट जिह्यातील मुधोळ तालुक्यातील महालिंगपूर येथील आहे. महेश नागप्पा मरीगोंड (वय 25) असे मृत जवानाचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.
महेश हे सहा वर्षांपूर्वी मराठा रेजिमेंटमध्ये दाखल झाले होते. तीन वर्षांपूर्वी त्याचा विवाह लक्ष्मी यांच्यासोबत झाला होता. हिमाचल प्रदेशमध्ये सेवा बजावत असलेल्या महेश यांची बदली जम्मू-काश्मीरला झाली. पत्नीसह राहत असलेल्या महेश यांनी बदली झाल्याने पत्नीला घरी महालिंगपूरला पाठवले. पत्नी लक्ष्मी घरी पोचल्यावर फोनवर महेश यांच्याबरोबर झालेले बोलणे अखेरचे ठरले. कारण त्याच दिवशी सैन्याचे वाहन दरीत कोसळण्याची दुर्घटना घडली. पत्नी घरी पोहोचली तर तिचा पती जवानाला हौतात्म्य आले. महेश हे गतवर्षी ऑगस्टमध्ये महालिंगपूरला आले होते तीच त्यांची संबंधितांसोबतची अखेरची भेट ठरली.
महेश यांच्या पश्चात आई, पत्नी, भाऊ, बहीण असा परिवार आहे. गुरुवारी सकाळी महालिंगपूरला पार्थिव आल्यानंतर सायंकाळी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.









