भाविकांची अलोट गर्दी : भंडाऱ्याच्या उधळणीत लक्ष्मी माता की जय…उदे गं आई उदे…चा अखंड जयघोष
वार्ताहर/बाळेकुंद्री
रिमझिमच्या पावसात लक्ष्मी माता की जय… उदे गं आई उदे.. हर हर महादेव.. च्या जयघोषात भंडाऱ्याची उधळण करत बँड व डॉल्बीच्या निनादात बाळेकुंद्री खुर्द गावची ग्रामदेवता श्री महालक्ष्मी देवी मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारासह गाभाऱ्याची चौकटीची भव्य मिरवणूक बुधवारी श्रावण मासाच्या शुभमुहूर्तावर काढण्यात आली.. सदर मिरवणुकीला बाळूमामाच्या आवारातील जाधव सरकार यांच्या घराच्या आवारापासून प्रारंभ झाला. यावेळी सुशोभित ट्रॅक्टरमध्ये मुख्य प्रवेशद्वारासह गाभाऱ्यातील सागवानी लाकडाची चौकट विराजमान होती. यावेळी समस्त जाधव, पगडी व करविनकोप कुटुंबाच्या वतीने चौकटीचे पूजन, आरती झाल्यानंतर चौकट मिरवणुकीचा शुभारंभ करण्यात आला.
जाधवनगर, पेठ गल्ली, कलमेश्वर गल्ली व मारुती मंदिरमार्गे मिरवणूक निघून सायंकाळी साडेचारच्या सुमारास महालक्ष्मी मंदिराच्या आवारात मिरवणुकीची सांगता करण्यात आली. गावातील महिलांनी मिरवणुकीच्या दरम्यान ठिकठिकाणी चौकटीचे पूजन करून औक्षण करण्यात आले. याप्रसंगी मिरवणुकीत सहभागी झालेल्या भक्तांसाठी अल्पोपाहारचे वाटप करण्यात आले. मिरवणुकीच्या अग्रभागी असलेल्या बँड, डॉल्बी व धनगरी ढोलच्या गजरामुळे ही मिरवणूक साऱ्यांचे लक्ष वेधून घेत होती. नियोजनबद्ध पार पडलेल्या चौकट मिरवणूक सोहळ्यामुळे गावात भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते. उद्या गुरुवार दि. 21 ऑगस्ट रोजी सकाळी आठ वाजता चौकट पूजन समारंभ पार पडणार आहे.









