वार्ताहर/किणये
हलगा गावातील जागृत महालक्ष्मी देवीची यात्रा मंगळवार दि. 18 पासून होणार आहे. या यात्रेनिमित्त गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. गावात तब्बल अकरा वर्षानंतर यात्रा होणार असल्यामुळे साऱ्यांनाच या यात्रेची उत्सुकता लागून राहिली आहे. गावात यात्रेची जय्यत तयारी सुरू आहे. यात्रा नऊ दिवस साजरी करण्यात येणार आहे. हलगा ग्राम पंचायत व देवस्थान पंच कमिटी यांच्यावतीने यात्रेचे नियोजन करण्यात आले आहे. येणाऱ्या भक्तांची व्यवस्थित सोय व्हावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मंगळवार दि. 18 रोजी सकाळी 8:35 या शुभमुहूर्तावर श्री महालक्ष्मी देवीचा विवाह सोहळा होणार आहे.
त्यानंतर हक्कदार, देसाई व देवस्थान पंच कमिटी यांच्यावतीने देवीची ओटी भरण्याचा कार्यक्रम होणार आहे. यानंतर वाजत गाजत गावातील सर्व देव-देवतांची ओटी भरण्यात येणार आहे. बुधवार दि. 19 रोजी सार्वजनिक ओटी भरण्याचा कार्यक्रम होणार आहे. ओटी भरताना पारंपारिक वाद्यांचा गजर व भंडाऱ्याची उधळण करण्यात येणार आहे. लक्ष्मी गल्ली येथील लक्ष्मी मंदिर ते ग्राम पंचायत या हद्दीतील ग्रामस्थांच्या वतीने ओटी भरण्यात येणार आहे. गुऊवार दि. 20 रोजी छत्रपती श्री संभाजी गल्ली, लक्ष्मी चौक व श्री छत्रपती शिवाजी महाराज गल्ली यांच्यावतीने ओटी भरण्यात येणार आहे.
शुक्रवार दि. 21 रोजी गावातील सर्व जैन समाजाच्या वतीने ओटी भरण्यात येणार आहे. शनिवार दि. 22 रोजी गावातील दोन्ही आंबेडकर गल्लीतील ग्रामस्थांच्या वतीने ओटी भरण्यात येईल. रविवार दि. 23 रोजी नवी गल्ली व बसवाण गल्ली यांच्यावतीने ओटी भरण्यात येईल. रात्री 8 वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन चरित्रावर आधारित महानाट्या सादर करण्यात येणार आहे. सोमवार दि. 24 रोजी मरगाई गल्ली, गणपत गल्ली, तानाजी गल्ली व विजयनगर यांच्यावतीने ओटी भरण्यात येणार आहे. दि. 25 रोजी सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. 26 रोजी या यात्रेची सांगता होणार आहे. सर्वांनी या यात्रेचा लाभ घ्यावा, असे कळविण्यात आले आहे.









