पालकमंत्री सतीश जारकीहोळी, आमदार राजू सेठ यांची उपस्थिती : भाविकांची मोठी गर्दी
वार्ताहर /धामणे
येथील श्री महालक्ष्मी व मारुती मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याच्या शेवटच्या दिवशी बेळगाव जिल्हा पालकमंत्री व कर्नाटकाचे बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी व आमदार राजू सेठ, म. ए. समितीचे नेते रमाकांत कोंडूसकर, रमेश गोरल यांनी दोन्ही मंदिरांनी भेटी देऊन दर्शन घेतले. गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या दोन्ही मंदिरांच्या लोकार्पण सोहळ्याच्या शेवटच्या दिवशी सकाळी 9 वा. श्री अडवी सिद्धेश्वर मठाचे स्वामी यांचे व श्री माधव प्रभूजी ईस्कॉन यांची प्रवचने झाली. देवस्थान पंच कमिटीच्यावतीने मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. दुपारी 1 वा. महाप्रसाद वाटप करण्यात आले. दुपारी 2 वा. मंत्री सतीश जारकीहोळी यांचे आगमन झाले. ग्रा. पं. अध्यक्ष पंडित पाटील यांनी शाल व मालार्पण करून स्वागत केले. नागरिकांच्यावतीने रवि बस्तवाडकर यांनी सत्कार केला.
सतीश जारकीहोळी यांनी दोन्ही मंदिरात जावून देवांचे दर्शन घेतले. मंदिर आवारात पंच कमिटीच्यावतीने मंत्र्यांचे व आमदारांचे स्वागत करण्यात आले. दुपारी 4 वा. समिती नेते रमाकांत कोंडूस्कर यांचे आगमन झाले. येथील धामणे विभाग समितीच्यावतीने किरण चतूर, उमेश डुकरे व ग्रामपंचायतच्यावतीने ग्रा. पं. अध्यक्ष पंडित पाटील, एम. आर. पाटील व ग्रा. पं. सदस्य यल्लाप्पा रेमाणाचे यांनी शाल व मालार्पण करून स्वागत केले. त्यानंतर कोंडूस्करांनी लक्ष्मी व मारुती देवांचे दर्शन घेतले. या ठिकाणी देवस्थान पंच कमिटीच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. उत्सवाच्या शेवटच्या दिवशी देवांच्या दर्शनासाठी पंचक्रोशीतील भाविकांनी मोठी गर्दी केली होती. रात्री मंदिर आवारात सांस्कृतिक कार्यक्रम होऊन सोहळ्याची सांगता झाली.









