बेळगाव : अनगोळ ग्रामदेवता श्री महालक्ष्मी देवीचा वार्षिक वाढदिवस मंगळवार रोजी 3 जून रोजी महात्मा गांधी स्मारक येथील जुन्या श्री महालक्ष्मी मंदिर येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्त देवीचे मानकरी राजू सुतार यांच्या घरातून महालक्ष्मी देवीला आकर्षक बाशिंग घेऊन सुभाष गल्ली, हणमण्णावर गल्ली, मारुती गल्ली येथून लक्ष्मी गल्लीमार्गे मंदिरात वाजतगाजत मिरवणुकीने आणण्यात आले आणि मानकऱ्यांच्या हस्ते बाशिंग बांधून पूजा करण्यात आली. यावेळी लक्ष्मी मंदिर कमिटीचे सदस्य तसेच मानकरी प्रमोद पाटील, अजित पाटील, अशोक भेंडीगेरी, राजू भेंडीगेरी, जितेंद्र गुंडप्पणावर, सुधीर भेंडीगेरी तसेच गावातील पंच मंडळी व सदस्य उपस्थित होते.
यावेळी देवीला आकर्षक फुलांचे तोरण, बाशिंग, विड्याच्या पानांचा आकर्षक हार, देवीच्या मखराला आकर्षक सजावट केली होती. गाभाऱ्यात विविध रंगांच्या फुलांची सजावट व संपूर्ण मंदिराला विद्युत रोषणाई केली होती. पहाटे देवीची विधिवत पूजा-अर्चा मान्यवर व हक्कदारांच्या उपस्थितीत करण्यात आली. देवीची महाआरती आणि ओटी भरण्याचा कार्यक्रम सकाळी 9 वा. सुरू झाला. यानंतर संपूर्ण दिवसभर गावातील महिला व भाविक भक्तांनी देवीची ओटी भरून दर्शन घेतले आणि तीर्थप्रसादाचा लाभ घेतला. रात्री उशिरापर्यंत देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांची गर्दी पाहावयास मिळाली.









