अध्याय सोळावा
स्वतःच्या विभूतींबद्दल सांगताना भगवंत म्हणाले, सहनशीलांमध्ये सहनशक्ती म्हणतात ती मीच, सात्त्विकांची जी मूळची सत्त्ववृत्ती तीही मीच होय. बलवानांच्या ठिकाणी अत्यंत प्रबळ असे जे मनोबळ, शरीरबळ व धैर्यबळ असते व ज्याच्या योगाने तो यत्किंचितही डगमगत नाही, ते धैर्यबळही मीच. ज्याच्या योगाने मजविषयी अनिवार प्रेम उत्पन्न होते, असे जे भक्तांच्या अंगचे कामना नष्ट करणारे भजनकर्म ते मीच होय. नऊ प्रकारच्या भक्तिपूर्वक पूजाविधीसाठी भक्तांना ज्या नऊ प्रकारच्या मूर्ती सांगितल्या आहेत, त्यात मज वासुदेवाची मूर्ती प्रथम होय. आता इतर नऊ मुर्तींबद्दल सांगतो. वासुदेव, संकर्षण, अनिरुद्ध, प्रद्युन्म, हयग्रीव, नारायण, वराह, वामन आणि नरसिंह ही नऊ प्रकारच्या मूर्तीची स्वरूप आहेत. त्यात पहिली जी मूर्ती ती मी होय. उद्धवा! बाकीच्या ज्या आठ मूर्ती आहेत, त्याही माझ्याच विभूती होत. हयग्रीव ही वेदाची मूर्ती आहे. तिची श्रीव्यासांनी भक्ती केल्यामुळे त्यांना ‘वेदव्यास’ ह्या पदवीची प्राप्ती झाली व त्रिभुवनात आपला लौकिक गाजवून सोडला. नारायण ही मत्स्वरूपी मूर्ती आहे. ब्रह्मदेवाने तिची भक्ती करून चतुःश्लोकांनी ज्ञान प्राप्त करून घेतल्यामुळेच तो खरोखर ब्रह्मपदाला पोचला.
श्वेतवराह ही सर्वात श्रे÷ मूर्ती होय. तिची पृथ्वीने परिपूर्ण भक्ती केली, म्हणून त्या दयासागराने तिचा उद्धार करून तिला अप्रतिम शांती अर्पण केली. वामनही माझीच मूर्ती होय. त्याचे देवांनी पूर्णपणे भजन केले तेव्हा त्या देवांचा होणारा छळ बंद करण्यासाठी वामनाने बळीला बांधून टाकले आणि देवांचा अधिकार देवांना देऊन त्यांचा सन्मान केला. नरहरि ही एक दिव्य मूर्ती आहे. प्रल्हादाने त्या मूर्तीची एकनि÷ भक्ती केली. मी सर्व विश्वाचा आत्मा असून सर्व प्राणिमात्रांच्या ठिकाणी सर्वत्र भरून राहिलेलो आहे, ही गोष्ट त्याने सर्व लोकांच्या अनुभवास आणून देऊन सर्वांचा विश्वास त्यावर बसविला. संकर्षण म्हणजे बळराम ही मूर्तीही श्रे÷च आहे. ब्रह्मदेवाच्या आज्ञेवरून रैवतक पर्वताने त्याची भक्ती केली व आपली कन्या रेवती त्यास अर्पण करून तो आत्मानंदानुभवाने तृप्त झाला. प्रद्युम्न ही मूर्ती कामस्वरूप आहे. ह्याकरिता नाना प्रकारच्या इच्छा करणाऱया कामुकांनी त्याची भक्ती करून ज्या इच्छा मागितल्या, त्यांचे ते ते इच्छित मनोरथ तो निश्चयेकरून पूर्ण करतो. अनिरुद्ध हाही माझा अत्यंत जिवलग होय. शिवाच्या आज्ञेवरून उषेने त्याची भक्ती केली आणि तिने बाणासुराचा उद्धार केला. नारदाच्या आज्ञेने चित्ररेखेने तिला साहाय्य केले. पूर्णाशाने ब्रह्मस्वरूप आदिमूर्ती जो वासुदेव तो मीच होय. मी लीलेनेच कित्येकांचा उद्धार केला. त्यांची गणना करता येत नाही. माझी भक्ती उद्धवाच्या ठिकाणी व अर्जुनाच्या ठिकाणी मात्र नांदत आहे. उद्धवा ! ह्याप्रमाणे नऊ प्रकारच्या भक्ती, नऊ प्रकारच्या मूर्ती आणि त्यांच्या भक्तीचा प्रकार मी तुला यथार्थ रीतीने कथन केला. ज्याचे गायन अत्यंत अपूर्व आहे, असा जो विश्वावसु नामक गंधर्व तो मीच. मनोहर नृत्य करून सुस्वभावाने अंतर्बाह्य सुंदर दिसणारी जी ‘पूर्वचित्ती’ नांवाची अप्सरा, ती मी. पृथ्वीमध्ये जे स्थैर्य आहे, ते मी आहे. पृथ्वीमध्ये जो गंध म्हणून आहे तोही स्वतः मीच आहे. उदकामध्ये उत्तम रस तो मीच. आणखी उद्धवा ! तेजस्वी प्राण्यांमध्ये जो प्रकाश तो मीच स्वयंज्योति होय. चंद्र सूर्य ताऱयांच्या ठिकाणी जे तेज आहे, ते माझेच आहे. आणखी आकाशालाही मुळीच लिप्त न होणारा अनाहतध्वनी तोही मीच.
ब्राह्मणभजनामध्ये बळीचे श्रे÷त्व आहे. तो बळी निश्चयेकरून मीच होय. ब्राह्मणभजनाच्या सामर्थ्याने मला बळीच्या द्वारातील द्वारपाल केले आहे.
पांडवांमध्ये सामर्थ्याने परिपूर्ण नरावतार जो अर्जुन तो मीच होय. म्हणूनच तो माझा जीव की प्राण आहे. उद्धवा ! प्राणिमात्रांची उत्पत्ती, स्थिती तीही मीच आणि त्या प्राण्यांची जी संहारगती, तीही खरोखर मीच होय. चालणे, बोलणे, मलत्याग करणे, आनंद उपभोगणे, स्पर्श, पाहाणे, स्वाद घेणे, ऐकणे, वास घेणे ही कामे करणाऱया सर्व इंद्रियांची शक्ती मीच आहे.
क्रमशः







