राजाला झालेला स्मृतीभ्रंश म्हणजे नियतीचा खेळच असे सानुमतीला वाटते. विदूषकाला मात्र शंका असते की, ती अंगठी कोळय़ाने कापलेल्या तांबडय़ा माशाच्या पोटात कशी आली? तेव्हा राजा सांगतो की, तुझी वहिनी शचीतीर्थाला नमस्कार करताना बोटातून ती गंगेत पडली. सानुमतीला आश्चर्य वाटते की, अंगठी बोटातून पडल्याने ह्याची स्मृती कशी जाऊ शकते? प्रेमाला अशा खुणेची काय गरज? राजा त्या अंगठीला उद्देशून वेडय़ासारखा काही तरी बोलू लागतो. विदूषकाला मात्र खूप भूक लागलेली असते. पण राजा शकुंतलेच्या आठवणीतच रमलेला असतो. त्याला तिला कधी एकदा भेटेन असे झालेले असते. तेवढय़ात चतुरिका ही राजाची खास दासी हातात चित्रफलक घेऊन प्रवेश करते. ती शकुंतलेची तसबीर असते. ते अतिशय जिवंत चित्र असते. विदूषकाला तर तिच्याशी बोलण्याचा मोह होतो. ते चित्र खुद्द राजाने चितारलेले असते. पण त्यात गंमत म्हणजे तिघीजणी दिसत असतात. त्यातली शकुंतला कोणती ती ओळखून दाखव, असे राजा विदूषकाला सांगतो. विदूषक अतिशय मार्मिक वर्णन करून शकुंतला कोणती ते सांगतो. तो म्हणतो, ‘जलसिंचनामुळे सतेज झालेल्या आम्रवृक्षाजवळ उभी असलेली, मोकळे केस सोडलेली, थोडीशी दमलेली दिसणारी, मुखावर घर्मबिंदू साठलेली अशी ही शकुंतला असणार आणि उरलेल्या दोघी तिच्या सख्या असाव्यात’. राजा त्याच्या ह्या मार्मिकतेला दाद देतो. पण त्या चित्रात अंगठी काढायची राहिलेली असते. ते चित्र पूर्ण करण्यासाठी तो चतुरिकेला कुंचला आणण्यासाठी पाठवतो. विदूषकाला प्रश्न पडतो की हा आणखी काय काय चित्रात दाखवणार? त्यावर राजा उत्तरतो, त्याला मालिनीच्या तीरावर वाळूतील हंसांची जोडी, दोन्ही बाजूंना वनात बागडणारी हरिणे, एखादी विश्रांती घेणारी हरिणी, तर एखाद्या तरूखाली लटकलेली वल्कले….असे बरेच काही रेखाटायचे होते..विदूषकाला मात्र त्याने त्या चित्रफलकावर लांब दाढीचे तपस्वी रेखाटावेत असे वाटत असते! पण राजाला तिच्या कानात खोचलेले शिरीषपुष्प, गालाला लागलेले केसर इत्यादीही दाखवायचे असते. एकूण काय, तर शकुंतलेच्या चित्रात तो भलताच बुडून गेलेला असतो. त्याच्या प्रतिभेला जणू पंखच फुटू लागतात. तो कल्पनाविलासात रमून जातो, तेव्हा विदूषक त्याला भानावर आणतो. ही खरी शकुंतला नसून तिचे चित्र आहे, याची आठवण करून देतो. पण राजा वस्तुस्थिती जाणून नाराज होतो. त्याला सखीच्या विरहाचे दुःख असह्य होते. तेव्हा राजाने शकुंतलेला दिलेल्या दुःखाचे आता खरे परिमार्जन झाले असे सानुमतीला वाटते!
Previous Articleव्यवस्थापकांचे आत्मपरीक्षण
Next Article भुजवासीयांना ‘सुपर स्पेशालिटी’ भेट
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.








