वसंतोत्सवाला बंदी घातल्याचे दोघी दासी आणि सानुमतीलाही खरे कारण कळते. तेवढय़ात पडद्यातून ‘यावे, यावे आपण’ ह्या शब्दांमुळे राजाची स्वारी आल्याचे सूचित होते. पश्चात्तापदग्ध मनःस्थितीला अनुसरून वेशभूषा केलेला राजा आणि त्याचे प्रतीहारी, विदूषक वगैरे प्रवेश करतात. राजा कशाही परिस्थितीत असला तरी त्याची चर्या किती आल्हादक असते याचे वर्णन कंचुकी करताना दिसतो. साऱया आभूषणांचा त्याने त्याग केला आहे. केवळ एका हातात कडे घातले आहे. उसासे टाकून ह्याचे ओठ जणू पोळलेत. शकुंतलेच्या ध्यासाने ह्याला रात्री धड झोपही लागलेली नाही. तरी हा स्वतेजानेच उठून दिसतोय. हिरा घासल्यावर तो क्षीण दिसतो, परंतु तो अधिकच झळाळतो त्याचप्रमाणे! त्याच्या राजबिंडय़ा रूपाकडे पाहून सानुमतीलाही वाटते की, ह्याने शकुंतलेचा इतका अवमान करूनही ती ह्याच्यासाठी इतकी का झुरते ते आता कळतेय. विदूषकाला दुष्यंत शकुंतलेच्या वियोगाने झुरतोय हे पाहून याला ताळय़ावर कसे आणावे ते कळत नाही. कंचुकी राजाला प्रमदवनात त्याला आवडेल त्या जागी विश्रांती घ्यावी अशी विनंती करतो. तेव्हा तो प्रतीहारी वेत्रवतीला प्रधानजी पिशुनाकडे निरोप देण्यासाठी धाडतो. त्याला रात्रभर जागरण झाल्यामुळे न्यायासनावर तो बसणार नाही. तसेच प्रधानांनी लोकांचे जे कामकाज पाहिले असेल, ते पत्रात लिहून द्यायला सांगतो.
राजा इतर सेवकांना कामाला पाठवतो. विदूषक आता इथे कोणी नसल्याने प्रमदवनात राजाला बरे वाटेल असे सांगतो. पण राजाला मुनिकन्येची आठवण सतावत असते. सध्या वसंतोत्सव असूनही कामदेवाचा शर जणू धनुष्यावर नसून त्याच्या मनावर आघात करतोय असे वाटते. तेव्हा विदूषक बहादुरीचा आव आणून त्या मदनाच्या धनुष्याचा चुराच करून टाकतो, असे राजाला म्हणतो. तेव्हा त्यावर हसून राजा त्याला विचारतो की, ‘माझ्या प्रियेची आठवण करून देणाऱया लतांच्या दर्शनाने मला दृष्टी कुठे रमवता येईल?’ तेव्हा विदूषक त्याला आठवण करून देतो की, ‘कस्तुरमोगरीच्या कुंजात मी वेळ घालवणार आहे. तिथे शकुंतलेच्या चित्राची तसबीर घेऊन ये!’ असे त्याने चतुरिका ह्या खास दासीला सांगितलेय. आता दुधाची तहान त्याला शकुंतलेच्या चित्रावर भागवावी लागणार आहे. ते दोघे मंडपात गेल्यावर सानुमती वेलीच्या आडून तसवीर बघण्याचा प्रयत्न करते. राजाला आता शकुंतलेबाबत सारे काही आठवते. पण तो विसरला असला तरी विदूषकाने त्याला का आठवण करून दिली नाही? असे तो विचारतो. तेव्हा राजाने त्याला ते थट्टेतले बोलणे होते, दैवापुढे काही चालत नाही असे सांगितले असल्याचे सांगतो.








