सतेज पाटील गटाच्या बाजूने न्यायालयाचा निकाल; सत्याचा विजय झाल्याची सतेज पाटलांची प्रतिक्रिया
राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या 1272 सभासद अपात्र झाल्याने महाडिक गटाला मोठा धक्का बसला आहे. महादेवराव महाडिक यांचे समर्थक असलेले हे सभासद बोगस असल्याचा दावा राजर्षि छत्रपती शाहू परिवर्तन आघाडीचे प्रमुख आमदार सतेज पाटील यांनी केला होता. प्रादेशिक सहसंचालक (साखर) यांनी यासंबंधीचा निकाल देताना हायकोर्टाचा निकाल कायम केला. अपात्र झालेल्यापैकी गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक, ग्रीष्मा महाडिक यांच्यासह महाडिक कुटुंबातील 10 जणांचा समावेश आहे. या निकालानंतर अखेर सत्याचा विजय झाला असल्याची प्रतिक्रिया आमदार सतेज पाटील यांनी दिला आहे.
राजाराम कारखान्याच्या निवडणूकीच्या तोंडावर कारखान्यांच्या सभासद यादीमध्ये अनेक बोगस मतदार किंवा अपात्र मतदार असल्याचा आरोप विरोधी राजर्षि छत्रपती शाहू परिवर्तन आघाडीचे प्रमुख आमदार सतेज पाटील यांनी केला होता. त्यासंबंधीत त्यांनी 1346 सभासदांच्या पात्रतेवर सवाल उपस्थित करून प्रादेशिक सहसंचलकांकडे अपिल केले होते.
मा. प्रादेशिक सहसंचालक (साखर), कोल्हापूर यांनी सर्व चौकशी अंती दि.14 फेब्रुवारी 2020 रोजी 1346 सभासद अपात्र केले होते. त्यानंतर प्रादेशिक सहसंचालकांचा आदेश सहकार मंत्रालयाने 18 फेब्रुवारी 2021 ला कायम केला. या निकालाला महाडिक गटाने हायकोर्टात आव्हान दिल्यानंतर सहकार मंत्री व प्रादेशिक सहसंचालक (साखर), कोल्हापूर यांचा निर्णय हायकोर्ट कायम केला.
त्यानंतर सुप्रिम कोर्टाने ही अपात्रता स्थगित करून सभासदांची फेरसुनावणी घेण्यासाठी हे प्रकरण प्रादेशिक सहसंचालकांकडे परत पाठवले. प्रादेशिक सहसंचालकांनी सर्व सभासदांचे म्हणने व्यक्तीगतरित्या ऐकून घेऊन सर्व कायदेशिर बाबी तपासल्या. आणि गुणदोषावर आदेश त्यातील 1346 पैकि 1272 सभासदांना अपात्र ठरवले.
या निकालानंतर परिवर्तन पॅनेलचे प्रमुख आमदार सतेज पाटील यांनी या निकालामुळे अखेर सत्याचा विजय झाला असल्याचे म्हटले आहे. तसेच राजाराम कारखान्याची फेरनिवडणूक घेण्यात यावी यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.









