कोल्हापूर / सुधाकर काशीद :
शिवाजी पेठेतील निवृत्ती चौकात भवानी शंकराचे अगदी रस्त्यालगत मंदिर आहे. सहज या मंदिराकडे पाहिले तर त्यात फार काही वेगळे दिसत नाही. पण जरा कुतहुलाने पाहिले तर खूप काही त्यात वेगळे दडले आहे आणि या मंदिरातील शिवलिंग बऱ्याच वेळा पाण्याखाली जाते, हे त्याचे वैशिष्ट्या आहे. याचे कारण काय तर पाणवठ्याच्या जागी हे मंदिर आहे. त्यामुळे तेथे पाण्याचे जिवंत स्त्राsत आहेत. अर्थात केवळ हे एकच महादेवाचे मंदिर नव्हे, तर कोल्हापुरातील बहुतेक महादेव मंदिरे पाणवठ्याच्या जागीच आहेत. किंबहुना कोल्हापुरात भूगर्भात पाणी कोठे आहे, याचे अस्तित्व दाखवणारी ही सर्व महादेवाची मंदिरे आहेत. धार्मिकता, पर्यावरण, जलसाठे याचे ते जणू प्राचीन पुरावेच जपले गेले आहेत.
आज महाशिवरात्र आहे. त्यामुळे या महादेव मंदिरात भाविकांची गर्दी होणार आहे. पूजाअर्चा होणार आहे. त्यामुळे केवळ शंभू महादेवाचे दर्शन नव्हे तर, जलसाठ्याच्या ठिकाणांनाही भाविकांचे पाय लागणार आहेत. या मंदिरांचे जतन जरूर होईल. पण त्या परिसरातल्या जलसाठ्याचे जतन ही देखील आपली जबाबदारी राहणार आहे आणि नव्या पिढीला कोल्हापूर परिसरातील महादेव मंदिरांची माहिती करून देताना त्या मंदिराचे जलसाठे किती उपयोगी आहेत, हे समजून देण्याची आपल्या पिढीवर जबाबदारी आहे.
जलसाठे व त्याच्या काठावरच्या या महादेव मंदिरांची वैशिष्ट्यो वेगवेगळी आहेत. त्यात धार्मिकता आहेच, पण जलसाठ्याची वेगळी कुतहुलता आहे. महाव्दार रोडवर वांगी बोळात हेमंत आराध्येंचा वाडा आहे. या वाड्यात तळघरासारखी छोटी जागा आहे. त्यात कायम पाणी आहे. पाणी इतके स्वच्छ की ते स्फटिकासारखे आहे. आणि त्यात कर्दमेश्वर म्हणून शिवलिंग आहे. वाड्यातून या तळघरात उतरण्यासाठी अतिशय चिंचोळा असा मार्ग आहे. एक वेगळ्या धाटणीचे हे मंदिर म्हणजे जलस्तोत्राचा जिवंत नमुना आहे.
शनिवार पेठेत बुरुड गल्लीच्या पुढे खोल खंडोबा मंदिर आहे. मंदिर इतके प्राचीन आहे की मूळ कोल्हापूरची वस्ती याच मंदिराच्या आसपास होती. म्हणजेच इसवी सन पूर्व पहिल्या–दुसऱ्या शतकातला हा सारा परिसर आहे. या मंदिरात उतरण्यासाठी वीस पायऱ्या आहेत. तेथे शिवलिंग आहे. खालची सर्व जागा ओलसर आहे. म्हणजेच तेथे पाण्याचे अस्तित्व आहे. पावसाळ्यात या मंदिरातील शिवलिंग पाण्यात बुडालेले असते.
पद्माराजे गर्ल्स हायस्कूलसमोर सिद्धेश्वर उद्यान आहे. ते मूळ सिद्धेश्वर तळे. त्याच्या काठावर सिद्धेश्वराचे मंदिर आहे. शिवलिंग आहे. आता तळे मुजवून तेथे सिद्धाळा उद्यान तयार केले आहे. मंगळवार पेठेत पद्माळा तळे होते. या तळ्dयाभोवती रेसकोर्स मैदान होते. या तळ्याकाठी महादेवाचे मंदिर आहे. आता तळे मुजवून तेथे क्रीडा संकुल झाले आहे. एक काळचा हा समृद्ध जलाशय होता. आता ते मुजवले असले तरी नवीन बांधकाम करताना भूगर्भातील पाण्याचा साठा उसळून वर येतो आणि आपले मूळ अस्तित्व दाखवतो.
गंगावेशीत ऋणमुत्तेश्वर मंदिर आहे. ते कुंभार तळ्याच्या काठावर उभे आहे. आता तळे मुजवून शाहू उद्यान केले आहे. मूळ कुंभार तळे मुजवले आहे. पण काठावर ऋणमुत्तेश्वर उभे आहे आणि भाविकांचे ते श्रद्धास्थान आहे. येथे एक काळी मोठा जलसाठा होता, हे सांगून न पटण्यासारखी सध्याची परिस्थिती आहे.
ज्या शाहू स्टेडियमवर हा फुटबॉलचा थरार रंगतो, ते स्टेडियम म्हणजे मूळ रावणेश्वर तलाव. पाणी आणि जलपर्णीने व्यापलेला. त्यात मध्यभागी रावणेश्वरचे मंदिर होते. दर सोमवारी एका छोट्या दगडी वाटेने भाविक या मंदिरात जाऊन शिवलिंगाचे दर्शन घ्यायचे. हा तलाव मुजवला गेला आणि तेथे शाहू स्टेडियम उभारले. तलावाच्या मध्यभागी असणारे रावणेश्वर मंदिर आता स्टेडियमच्या एका बाजूला स्थापित केले आहे. शाहू स्टेडियम म्हणजे जुना रावणेश्वर तलाव, हे नव्या पिढीला माहीत असणे गरजेचे आहे.
आता पद्माराजे गर्ल्स हायस्कूल आहे. तो पेटाळ्याचा आणि फिरंगाईचा एकेकाळचा तलाव. त्याच्या काठावर अग्नीश्वर शिवमंदिर होते. तळे बुजवले गेले व शाळेला जागा दिली. या तळ्dयाचे वैशिष्ट्या असे की या तळ्याचे पाणी गंधकयुक्त. त्यामुळे औषधी गुणधर्माचे. त्यात आंघोळ केली की त्वचारोग बरे व्हायचे. पण काळाच्या ओघात हा जलसाठा मुजवला गेला.
रंकाळयाच्या काठावर महादेवाचे नव्हे तर त्याच्या नंदीचे मंदिर आहे. या मंदिराचे वैशिष्ट्या असे की या मंदिरात नंदी गाभाऱ्यात आहे आणि शिवलिंग बाहेर आहे. एरव्ही सर्व मंदिरांत नंदी बाहेर आणि गाभाऱ्यात शिवलिंग असते. पण येथे उलटे आहे. मोठीच्या मोठी नंदीची मूर्ती गाभाऱ्यात आहे. रंकाळ्यासारख्या विस्तीर्ण जलाशयाच्या परिसरात हे मंदिर आहे.
कपिलतीर्थ मंडई हे एक तळेच होते. तळे बुजवून तेथे मंडई केली. काठावर अजून कपिलेश्वर मंदिर आहे, शिवलिंग आहे. फुलेवाडी लक्षतीर्थ वसाहतीत आजही तलाव आहे. काठावर लक्षतीर्थ महादेव आहे. शाहू मिलजवळ कोटीतीर्थाच्या काठाला कोटेश्वर महादेव मंदिर आहे. शिंगणापूरला नदीच्या काठालगतच हटकेश्वर महादेव मंदिर आहे. जयंती नदीच्या (नाला) पात्रालगत शाहूपुरीत फलगुलेश्वर महादेव मंदिर आहे. वडणगे येथे शिवपार्वतीच्याच नावाने तलाव आहे. पंचगंगा नदीच्या काठावर तारकेश्वर महादेव मंदिर आहे. उत्तरेश्वरावर सर्वात मोठे शिवलिंग आहे. त्या परिसरातून मयूर तीर्थाचे पाणी पंचगंगेला जाऊन मिळते. त्याच्या शुद्धीकरणासाठी प्लांट उभा केला आहे. बीड येथे प्राचीन महादेव आहे. ते पुरातत्व खात्याच्या देखरेखीखाली आहे.
अशा तऱ्हेने कोल्हापूरातील बहुतेक महादेव मंदिरे म्हणजे पाणवठ्याची ठिकाणे आहेत. मंदिर तर जपले जाणारच आहे. पण त्याबरोबर हे पाणवठेही जपले जाणे ही काळाची गरज आहे.








