अध्याय एकोणतिसावा
भगवंत म्हणाले उद्धवा, भक्ताने केलेली प्रत्येक कृती त्याने मला अर्पण करण्यातच त्याचे भले आहे. तुला असे वाटेल की, त्यात काय विशेष! ही तर चुटकीसरशी करतायेण्याजोगी गोष्ट आहे. पण तुला वाटतंय तेव्हढं हे बिलकुल सोपं नसतं कारण मायेच्या आवरणात गुंडाळली गेलेली माणसाची बुद्धी त्याच्याकडे असलेल्या गोष्टीतला कणभरसुद्धा दुसऱ्याला द्यायला तयार होत नाही, अगदी मलासुद्धा. माणसाला मनापासून विषय आवडत असल्याने त्याला विषयांची आसक्ती म्हणजे तीव्र ओढ असते. त्यासाठी तर तो कर्मे करत असतो पण उगीच दाखवायचं म्हणून लोक ते कर्म मला अर्पण केलं असं म्हणत असतात. उद्धवा, तुला ठकवणे म्हणजे काय ते माहित असेलच. ठक हा नेहमी सांगून सवरून तुम्हाला फसवत असतो. त्याप्रमाणे ओठात एक आणि पोटात एक असलेल्या मंडळींना असं वाटत असतं की, आपण देवाला ठकवलं पण त्यातून त्यांचंच नुकसान होत असल्याने, प्रत्यक्षात ते स्वत:लाच ठकवत असतात. त्यातील काही बुद्धिमान मंडळींना स्वत:च्या बुद्धीच्या जोरावर आपण विषयांची प्राप्ती करून घेतली असे वाटत असते. प्रत्यक्षात ते त्यांना मीच दिलेले असतात. हे लक्षात न घेता मी कर्ता आहे ह्या समजुतीतून त्यांनी देहाचे चोचले पुरवण्यासाठी ते कष्ट करत असतात. साहजिकच देहाबद्दल वाटणाऱ्या प्रेमाकडून ते ठकवले जातात. म्हणून कर्म करून मला अर्पण करण्याला फार महत्त्व आहे हेच माझ्या सांगण्याचं सार आहे. अशी बुद्धी जेव्हा माणसाला होते ना, तेव्हा तिला सद्बुद्धी असं म्हणतात पण अशी सद्बुद्धी होणारे लोक फार विरळा म्हणजे अगदी लाखात एखादा म्हणालास तरी चालेल. बाकी इतर लोक मी कर्ता आहे ह्या समजुतीतून स्वत:च स्वत:ला ठकवून घेण्यात मग्न असतात. कसे ते सांगतो ऐक, काही लोक स्वत:च्या बुद्धीचातुर्याने इतरांना फसवतात आणि त्यावर खुश होऊन स्वत:ला ठकवतात. तर काही लोक वेदशास्त्रसंपन्न होतात आणि आपण किती ज्ञानी आहोत म्हणून गर्वाने फुगतात. हा ज्ञानाचा गर्व त्यांना कधी ठकवतो ते त्यांचे त्यांनाच कळत नाही. काही बुद्धिमंत योगसाधक प्राणापान समान करून योगाभ्यास प्रवीण होतात पण त्यातून मिळालेल्या सिद्धींकडून ते संपूर्णतया नागवले जातात. काही कर्मठ लोक ते करत असलेल्या कर्माच्या अभिमानाने स्वत:ला श्रेष्ठ कर्ममार्गी समजतात. अशा एक ना अनेक मार्गांनी मनुष्य स्वत:ला ठकवून घेत असतो. बरे असे वागणाऱ्या मंडळींची संख्या आकाशातल्या ताऱ्यांच्याप्रमाणे असंख्य असते. असं जरी असलं तरी माझ्या भक्तीची गोष्ट उद्धवा वेगळीच असते बरं का, जो भाग्यवान असतो त्याच्याच वाट्यालाही येते. जो सर्वाभूती माझेच रूप पाहून त्याच्यासाठी कोणत्याही अपेक्षेशिवाय आवश्यक ते करण्यात धन्यता मानतो आणि त्याप्रमाणे वागतो तो माझी सर्वोत्तम भक्ती करत असतो. अर्थातच त्याच्या बुद्धीची जागा माझी बुद्धी घेते. माझ्या बुद्धीला महाबुद्धी म्हणतात. ह्या बुद्धीचे विशेष म्हणजे तिच्यामुळे प्रत्येक कर्म ब्रह्मार्पण करायची इच्छा होते. ह्याप्रमाणे महाबुद्धी प्राप्त झालेला भक्त सर्वाभूती माझे दर्शन घेत, केलेलं प्रत्येक कर्म मला अर्पण करून स्वत:च परिपूर्ण ब्रह्म होतो. उद्धवा तुझ्या लक्षात येतंय का, मानवी देह ही बघितली तर मायेची निर्मिती परंतु मायेने निर्माण केलेल्या मिथ्या देहाकडून केले जाणारे कर्म मला अर्पण करणारे स्वत: ब्रह्म होतात. हे म्हणजे कोंडा देऊन धान्याची महारास मिळवल्यासारखे किंवा फुटक्या काचेचा तुकडा देऊन चिंतामणी मिळवल्यासारखे आहे. खरे म्हणजे मिथ्या देहाकडून केले जाणारे कर्माचरण माणसाला दृढ बंधनात अडकवते पण तेच कर्म जर मला अर्पण केले तर तसे करणारा स्वत:च ब्रह्म होतो. हे आश्चर्य नव्हे तर काय? पण हे सर्व माहित असुनसुद्धा माणसे ह्याची प्रचीती घ्यायला सहजासहजी तयार होत नाहीत.
क्रमश:








