गणेश वंदना करून झाल्यावर, सर्व जगाला मोहून टाकणाऱ्या सरस्वतीला वंदन करताना माउली म्हणाले, सरस्वती ही वाणीची अपूर्व क्रीडा करणारी, चातुर्य, वागर्थ व कला यांची देवता आहे. पुढे माउली सद्गुरूंचे स्तवन करत आहेत. ते म्हणतात, सद्गुरूंनी मला या संसारपुरातून तारले असून ते माझ्या हृदयात आहेत. त्यांनी माझ्या हृदयात वास्तव्य केल्यामुळे मला चांगले काय आणि वाईट काय हे लगेच लक्षात येते आणि सद्गुरू माझ्याकडून जे चांगले असेल तेच घडवून घेतात. ज्याप्रमाणे डोळ्यात अंजन घातले की दृष्टी फाकल्याने भूमिगत द्रव्याचा सहज सुगावा लागून द्रव्याचा मोठा खजिना दृष्टीला पडतो किंवा ज्याप्रमाणे चिंतामणी हस्तगत झाल्यावर सर्व मनोरथ पूर्ण होतात, त्याप्रमाणे माझे सर्व मनोरथ श्री निवृत्तीनाथांच्यामुळे पूर्ण झाले आहे. एवढ्यासाठी गुरुभजन करावे व त्यायोगे कृतकृत्य व्हावे. ज्याप्रमाणे झाडाच्या मुळांना पाणी घातले असता फांद्या व पाने टवटवीत होतात अथवा समुद्रस्नानाने त्रैलोक्यातल्या सर्व तीर्थांचे स्नान घडते किंवा अमृताच्या सेवनाने सर्व रसांचे सेवन घडते, त्याप्रमाणे श्रीगुरूंना वंदन केले म्हणजे सर्वांनाच वंदन केल्यासारखे होते म्हणून मी श्रीगुरूंना पूज्य बुद्धीने वारंवार वंदन करतो.
महाभारताच्या कथेचा गौरव करताना माउली म्हणतात, गीतेची निर्मिती करणाऱ्या महाभारताच्या कथेचे महात्म्य आता सांगतो. ही कथा सर्व चमत्कारांची खाण आहे किंवा विचाररूपी वृक्षांचा बगिचा आहे. ही सर्व सुखांचे उगमस्थान आहे. अनेक सिद्धांतांचा साठा आहे, किंवा शृंगारादी नवरसरूपी अमृताने भरलेला समुद्र आहे. ही कथा मोक्ष देणारी असून सर्व विद्यांचे मूलस्थान आहे. त्याचप्रमाणे संपूर्ण शास्त्रांमध्ये श्रेष्ठ आहे. ही कथा सर्व धर्मांचे माहेरघर आहे, सज्जनांचा जिव्हाळा आहे, हा सरस्वतीच्या सौंदर्यरूप रत्नांचा जामदारखाना आहे. व्यासांच्या विशाल बुद्धिमध्ये स्फुरूण पावून सरस्वती या कथेच्या रूपाने त्रिजगतात प्रगट झाली आहे. म्हणून हा महाभारत ग्रंथ सर्व काव्यग्रंथाचा राजा आहे. या ग्रंथाच्या ठिकाणी मोठेपणाची कमाल झाली आहे व येथूनच रसांना रसाळपणाचा डौल आला आहे. याची आणखी एक महती म्हणजे यापासूनच शब्दांच्या संपत्तीला निर्दोष शास्त्राrयता आली आहे. त्यामुळे ब्रह्मज्ञानाची मृदुता वाढली आहे.
येथे चातुर्य शहाणे झाले आहे. तत्वांना गोडी येऊन सुखाचे ऐश्वर्य वाढले आहे. येथून कलांना कुशलता प्राप्त झाली, येथे पुण्य विशेष तेजस्वी झाल्याने ह्याच्या पठणाने जनमेजयाचे दोष हरले. विचार केला तर असे दिसून येते की, येथे आनंदाला विशेष मनोहरता आली आहे. सूर्याच्या प्रकाशाने प्रकाशित झालेले त्रैलोक्य ज्याप्रमाणे उज्वल दिसते त्याप्रमाणे व्यासांच्या बुद्धीने व्यापलेले विश्व शोभून दिसते. उत्तम जमिनीत बी पेरले असता त्याचा जसा हवा तसा विस्तार होतो, त्याप्रमाणे भारतामध्ये चारही पुरुषार्थ हवे तेवढे प्रफुल्लित झालेले आहेत. सोन्याची लगड पाहिली असता त्यातील सोने डोळ्यात भरत नाही पण दागिने बनवल्यावर तेच सोने आपले निराळेच सौंदर्य दाखवते, त्याप्रमाणे पुराणांनी असा विचार केला की, व्यासांच्या बोलण्याने आपण अलंकृत झालो तर लोकांना हवेसे होऊ, म्हणून जगामध्ये मोठेपणा प्राप्त व्हावा ह्यासाठी पुराणांनी आख्यानरूपाने महाभारतात प्रवेश केला. म्हणून महाभारतामध्ये जे नाही ते त्रैलोक्यातही नाही असे म्हणतात. अशा ह्या महाभारतामध्ये श्रीकृष्णाने अर्जुनाला संवादरूपाने उपदेश केलेली गीता कमलातील परागाप्रमाणे शोभून दिसते.
क्रमश:








