पुतीननं आक्रमण केल्यानंतर युक्रेनच्या बाजूनं अमेरिका हिरिरीनं उतरल्यानं या दोन्ही महासत्तांमध्ये जबरदस्त ठिणग्या उसळू लागल्या असल्या, तरी त्यांच्यात थेट संघर्षाचे प्रकार अजूनपर्यंत घडले नव्हते. मात्र बायडेन प्रशासनानं नुकताच त्यांचं ‘ड्रोन’ रशियाकडून पाडण्यात आल्याचा दावा केल्यानं वाद उफाळून येण्याबरोबरच भविष्यात चित्र बदलण्याची भीती व्यक्त होऊ लागलीय…
बऱयाच कालावधीनंतर दोन ‘सुपरपॉवर्स’मधील संघर्षाचं खतरनाक दर्शन घडलंय आणि त्या घटनेनं साऱया जगाचं लक्ष आपल्या दिशेनं खेचण्याचं काम इमाने इतबारे पार पाडलंय. तसं पाहिल्यास उडालेल्या ठिणग्यांचं स्वरूप लहान वाटत असलं, तरी त्यात लपलीत भविष्यातील अधिक गंभीर संकटांची बिजं…असं असलं, तरी अमेरिकेचे संरक्षणमंत्री लॉईड ऑस्टिन यांनी महासत्ता टेहेळणी करण्याचं काम अजिबात थांबविणार नसल्याचं ठामपणे सांगितलंय. युक्रेनला रशियाविरुद्धच्या झुंजीत पाठिंबा देणाऱया सुमारे 50 राष्ट्रांच्या प्रतिनिधींच्या ‘व्हर्च्युअल’ बैठकीत बोलताना त्यांनी म्हटलंय की, आंतरराष्ट्रीय नियमांचं पालन करून वॉशिंग्टन आपलं कर्तव्य पार पाडेल…‘हे अत्यंत धोकादायक प्रकरण असून त्यानं दर्शन घडविलंय ते रशियन वैमानिकांच्या आक्रमक, असुरक्षित वृत्तीचं अन् आंतरराष्ट्रीय हवाई हद्दीच्या नियमांना ते कसे किंमत देत नाहीत त्याचं. रशियन लष्करानं व्यावसायिक परिक्ववता दाखवून द्यायला हवी’, ऑस्टिन यांनी केलेली परखड टीका…
पण प्रकरण नेमकं आहे तरी काय?…अमेरिका आणि युक्रेननं केलेल्या आरोपांनुसार, ‘अंकल सॅम’चं शस्त्रविरहीत ‘एमक्यू-9 रिपर ड्रोन’ आंतरराष्ट्रीय हवाई हद्दीत नेहमीप्रमाणं त्याच्या मोहिमेवर होतं. ‘पेंटॅगॉन’नं मॉस्कोचं वर्णन ‘निष्काळजी, बेफिकीर, बेपर्वा’ अशा शब्दांत करताना केलेल्या दाव्याप्रमाणं, रशियाच्या विमानांनी ‘ड्रोन’वर हवाई इंधन ओतल्यानंतर एका विमानानं त्याच्या पंख्यांची पाती कापून टाकली. त्यामुळं अमेरिकी ऑपरेटरसमोर ते काळय़ा समुद्रात पाडण्याशिवाय पर्याय राहिला नाही…युक्रेनच्या अधिकाऱयांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘ड्रोन’ त्या देशाच्या किनाऱयापासून 48 किलोमीटर अंतरावर असलेल्या ‘स्नेक आयलंड’च्या दक्षिणपूर्व दिशेला पाण्यात पडलं. युक्रेनच्या ‘नॅशनल सिक्युरिटी अँड डिफेन्स कौन्सिल’चे सचिव आलेक्सी डेनिलोव्ह यांनी म्हटलंय की, पुतीन आपल्या मित्रदेशांच्या साहाय्यानं युद्धाचा विस्तार करण्यासाठी सिद्ध झालेत…
रशियानं मात्र कानावर हात ठेवताना अशी ‘ड्रोन’ पाडण्याची घटनाच घडलेली नसल्याचं म्हटलंय आणि वॉशिंग्टनला इशारा दिलाय तो त्यांच्या ‘फायटर्स’ना आपल्या क्षेत्राच्या जवळपासही न फिरकण्याचा…रशियाच्या संरक्षण मंत्रालयाचे मुख्य प्रवक्ते लेफ्टनंट जनरल इगॉर कॉनोशेनकोव्ह यांनी त्यांच्या लढाऊ विमानांनी ‘एअरबोर्न’ शस्त्रांचा वापर केलेला नसल्याचं अन् अमेरिकेच्या ‘अनमॅन्ड एरियल व्हेइकल’च्या (ड्रोन) संपर्कात देखील जाण्याचा प्रयत्न करण्यात आला नसल्याचं स्पष्ट केलंय…‘आम्ही रशियाच्या सरहद्दीजवळ घुसखोरी करणाऱयांचं निरीक्षण करण्यासाठी फायटर्स जेट मात्र पाठविली होती’, असं सांगण्यास ते विसरले नाहीत….
रशियाच्या मतानुसार, वॉशिंग्टन टेहेळणीच्या नावाखाली युक्रेनला माहितीचा पुरवठा करत असून कीवचा (युक्रेनची राजधानी) प्रयत्न असतो तो त्याच्या साहाय्यानं रशियाच्या सैनिकांवर, भूभागावर आक्रमण करण्याचा. पुतीनच्या राष्ट्रानं विचारलंय की, जर रशियन ड्रोन न्यूयॉर्क वा सॅन फ्रान्सिस्को शहराजवळ दिसलं असतं, तर अमेरिकेच्या हवाई दलानं वा नौदलानं कुठली भूमिका घेतली असती? रशियाच्या माध्यमांनी घटनेला फारसं महत्त्व दिलेलं नसलं, तरी काही राजकीय नेत्यांच्या मते, वॉशिंग्टन मॉस्कोला थेट भिडण्याचा प्रयत्न करतोय अन् युक्रेनशी चालू असलेल्या झुंजीत ते सामील असल्याचा हा दणदणीत पुरावा…
अमेरिकेनं त्यांच्या ड्रोनवर रशियन विमानानं इंधन टाकलं त्या क्षणाचं ‘फुटेज’ही जारी केलंय. त्यामुळं राजनैतिक भांडण पुन्हा उफाळून तर आलंयच शिवाय सदर ड्रोनचं उच्च श्रेणीचं तंत्रज्ञान चुकीच्या हातात पडू नये यासाठी धडपडही सुरू झालीय. रशियाच्या सुरक्षा मंडळाच्या सचिवांनी ड्रोनचे अवशेष मिळवण्याचा प्रयत्न करून त्याचा अभ्यास केला जाऊ शकतो, असं सांगून आगीत तेल ओतलंय…
अमेरिकेचं हवाई दल ‘रिपर ड्रोन’चा वापर प्रामुख्यानं करतंय ते टेहेळणी करून माहिती गोळा करण्यासाठी. परंतु शस्त्रसज्ज केल्यास त्याचा उपयोग लक्ष्यभेद करण्यासाठी देखील केला जाऊ शकतो. मात्र हे त्याच्यावरील शस्त्रप्रणाली आणि किती दीर्घ कालावधीसाठी ते एखाद्या क्षेत्राचं निरीक्षण करू शकतं त्या क्षमतेवर अवलंबून राहतं. थोडक्यात ‘रिपर’ हे शत्रूवर नजर ठेवणं आणि प्रहार करणं अशा दोन्ही जबाबदाऱया पेलण्याच्या दृष्टीनं सक्षम. त्यामुळंच त्याला लष्करी वर्तुळात ‘हंटर किलर’ असं टोपण नाव मिळालंय…
अमेरिकी हवाई दल अनेक मोहिमांसाठी या ‘ड्रोन’वर अवलंबून राहिलंय. संरक्षण खात्याच्या अलीकडील एका अहवालानुसार, 2019 पर्यंत त्यांनी एकूण 20 लाख तास आणि दरवर्षी सुमारे 3 लाख 30 हजार तास उड्डाण केलंय. हे ‘रिपर ड्रोन’ अत्यंत महाग असून हवाई दलानं दिलेल्या माहितीप्रमाणं, चार ‘ड्रोन्स’च्या एका युनिटची किंमत 56.5 दशलक्ष डॉलर्सच्या घरात जाते. अमेरिकेच्या नेतृत्वाखाली इराक नि अफगाणिस्तानमध्ये लढल्या गेलेल्या युद्धांमध्ये त्याचा भरीव प्रमाणात वापर केला गेला होता…गेल्या वर्षी युक्रेनवर रशियानं आक्रमण केल्यानंतर अमेरिकी हवाई दल आपली काही जुनी ‘ड्रोन्स’ कीवला पाठवण्याचा विचार करत असून ‘पेंटॅगॉन’ला त्यासाठी राजी करण्याचा प्रयत्न चालल्याचं वृत्त समोर आलं होतं !
– राजू प्रभू