महाबळेश्वर जावळी वाई तालुक्याची स्ट्रॉबेरी रोपे निघाली परराज्यात !
by इम्तियाज मुजावर
सातारा : सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर, वाई आणि जावळी तालुक्यांतील सुपीक माती आणि थंड हवामान स्ट्रॉबेरी लागवडीसाठी वरदान ठरले आहे. केवळ फळ उत्पादनापुरते न थांबता येथील शेतकऱ्यांनी आता स्ट्रॉबेरीच्या मदर प्लांटपासून लाखो रोपे तयार करून देशभर डिमांड निर्माण केली आहे.
या भागात तयार होणाऱ्या स्ट्रॉबेरी रोपांना पंजाब, हरियाणा, दिल्ली, हैदराबाद आणि तामिळनाडू यांसारख्या राज्यांतून मोठ्या प्रमाणावर मागणी येत आहे. एका एकरात दोन ते अडीच लाख रोपे तयार होतात आणि त्यातून सुमारे २० ते २२ लाख रुपयांचा नफा मिळतो. सध्या एका रोपासाठी ८ ते १२ रुपये बाजारभाव मिळत आहे.
स्थानिक शेतकरी तुषार शिवतरे यांनी सांगितले, “आमच्याकडे तयार होणाऱ्या रोपांची गुणवत्ता उच्च दर्जाची आहे. एजंट थेट गावात येऊन खरेदी करून नेतात. यंदा पावसामुळे थोडं नुकसान झालं, तरी दर्जा टिकून आहे.”
सातारा पश्चिम भागात सध्या स्ट्रॉबेरीच्या सुमारे १४ जाती लागवडीत आहेत. या रोपांमधून फक्त फळ नाही, तर एक नव्या प्रकारचा शेती व्यवसाय उभा राहत आहे. या भागातील शेतकरी आधुनिक पद्धती, मेहनत आणि नवकल्पनांच्या आधारे शेतीत यशाचं उदाहरण उभं करत आहेत.
साताऱ्यातून देशभर पसरलेली स्ट्रॉबेरीच्या रोपांची गोड सुवास, हा आधुनिक शेतीचा आदर्श आणि शेतकऱ्यांच्या स्वावलंबनाचा प्रेरणादायी प्रवास बनला आहे. महाबळेश्वरच्या शेतकऱ्यांनी दाखवून दिला आहे की जिद्द आणि नवोन्मेषाने शेतीही सोनं उगवू शकते
–








