महाबळेश्वर :
महाबळेश्वर आणि पाऊस हे समीकरण ठरलेलेच आहे, याचा प्रत्यय गेल्या काही दिवसांपासून येत आहे. जून महिन्याच्या प्रारंभी उघडीप दिलेल्या पावसाने आता महाबळेश्वरला मुसळधार पावसाने झोडपून काढले असून नागरिकांची व पर्यटकांची तारांबळ उडाली आहे. शहर व ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुसळधार पावसामुळे महाबळेश्वर-तापोळा रस्ता चिखली गावच्या हद्दीत वाहून गेला असून रस्त्यावर दरडी कोसळल्या आहेत.
दरम्यान दरड कोसळलेल्या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दरड माती काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. रस्ता पूर्ववत सुरू होत नाही तोपर्यंत यामार्गावरील वाहतूक मांघर मार्गे झोंळखिंड वळविण्यात आली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहिती नुसार महाबळेश्वर शहरात गेल्या 24 तासात 189 मि. मी (7 इंच) या वर्षातील उच्चांकी पावसाची नोंद झाली आहे. मुसळधार पावसामुळे अंबेनळी घाट गुरुवारी सायंकाळी 7 वाजल्यापासून अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्यात आला आहे. वीर धरणातून दोन हजार क्युसेकने विसर्ग करण्यात आला असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. तसेच शुक्रवारी सकाळी कण्हेर धरणातून एक हजार क्युसेकने विसर्ग होणार आहे.
महाबळेश्वरमध्ये पावसाने जोरदार पुनरागमन केले आहे. कडाक्याची थंडी, दाट धुक्यासह पावसाची संततधार सुरु आहे. यामुळे वेण्णालेकच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली आहे. ओढे नाले तुडूंब भरून वाहू लागले आहेत. पावसाचा मनमुराद आनंद घेण्यासाठी पर्यटकांची तुरळक गर्दी येथे दिसून येत आहे. वेण्णालेकसह परिसर दाट धुक्यात हरवून गेला आहे.
प्रसिद्ध लिंगमळा धबधबा ओसंडून वाहत आहे. पर्यटक पर्यटनाचा आनंद लुटत आहेत. दि. 1 जून ते 18 जून या कालावधीत 465. 6 मि. मी (18.33 इंच) पावसाची नोंद झाली आहे. तर आज अखेर पर्यंत 24 तासात एकूण 189 मि. मी (7 इंच) तर एकूण 655 मि. मी (25 इंच) पावसाची नोंद करण्यात आली आहे.
मुसळधार पाऊस होत असल्याने पर्यटन स्थळावरील सेल्फी पाईंट तसेच तालुक्यातील लिंगमळा धबधबा, भिलार धबधबा, अंबेनळी व तापोळा घाटातील सर्व लहान मोठे धबधबे तसेच (तलाव, वाहत असलेले ओढे-नाले,पूल) अशा धोकादायक ठिकाणी जाणे पर्यटकांनी टाळावे, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.








