महाबळेश्वर :
रस्ता रूंदीकरणाच्या कामाच्या ढिसाळ नियोजनामुळे अंबेनळी घाटात मोठ्या प्रमाणावर दरड कोसळली आहे. दरड हटविण्याच्या कामासाठी अंबेनळी घाट पुढील चार ते पाच दिवसांसाठी बंद करण्यात आला आहे. अंबेनळी घाटातुन होणारी महाबळेश्वर पोलादपूर दरम्यानची वाहतूक या घटनेमुळे प्रभावित झाली आहे. ऐन विकेंडच्या दरम्यान अंबेनळी घाट वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्याने कोकणमार्गे महाबळेश्वरला येणारे पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होणार असुन पर्यटकांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागत आहे.

सुरूर ते पोलादपुर या दरम्यान हॅम योजनेतुन रस्ता रूंदीकरणाचे काम सुरू आहे. वाईपासुन महाबळेश्वरकडे तर पोलादपूरपासुन महाबळेश्वरकडे अशा प्रकारे दोन्ही बाजुने रस्ता रूंदीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे. पोलादपूरपासुन महाबळेश्वरपर्यंत अंबेनळी घाट आहे. या घाटात डोंगराच्या बाजुने रस्ता रूंदीकरणासाठी मोठ्या प्रमाणावर जेसीबी व पोकलेनच्या मदतीने माती व दगड काढण्याचे काम सुरू आहे. हे काम करताना संबंधित ठेकेदाराने माती व दगड काढताना वरून दरड कोसळणार या बाबींचा विचार केलेला दिसत नाही व त्याबाबतचे नियोजन करण्यात न आल्याने अंबेनळी घाटात पोलादपुर विभागाकडील भागात अनेकवेळा दरडी कोसळण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे या दरम्याच्या वाहतुकीवर अशा घटनांचा परिणाम होवुन पर्यटकांना व नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. गुरूवारी अशाच प्रकारे अंबेनळी घाटात रस्ता रूंदीकरणाचे काम सुरू आहे. त्याच ठिकाणी मोठ्या प्रमाणावर दरड कोसळुन डोंगरातील माती व दगड हे घाटातील रस्त्यावर आले आहे. आता ही दरड हटविण्याच्या कामासाठी चार ते पाच दिवस लागणार असल्याने खबरदारीसाठी महाबळेश्वरचे तहसीलदार सचिन म्हस्के यांनी अंबेनळी घाट वाहतुकीसाठी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महाबळेश्वर ते पोलादपुर या दरम्यान अंबनेळी घाटातुन प्रवास करणारे वाहनांना याचा फटका बसणार आहे. प्रवासी व पर्यटकांना पुढील चार ते पाच दिवस पर्यायी मार्गाचा अवलंब करावा लागणार आहे.
प्रशासनाने निर्णय जाहीर करताच शुक्रवारी सकाळपासुनच महाबळेश्वर पोलिसांनी महाड नाका येथुन वाहतूक बंद केली. दरम्यान या निर्णयाची माहिती पोलादपुर प्रशासनास वेळेत न मिळाल्याने दरडी जवळुन पोलादपुर भागातुन वाहतुक सुरू होती. पोलादपूरपासुन निघालेली सर्व वाहने जेव्हा महाबळेश्वर येथे पोहोचु लागली तेव्हा प्रशासनाची धावपळ उडाली आणि त्यांनी तातडीने पोलादपूर प्रशासनाबरोबर संपर्क करून महाबळेश्वरकडे येणारी वाहतूक पोलादपूर पोलिसांनी बंद केली.








