सावंतवाडीत आज पक्षप्रवेश
सावंतवाडी । प्रतिनिधी
भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदावर रवींद्र चव्हाण यांची नियुक्ती झाल्यावर प्रथमच सिंधुदुर्ग जिल्ह्यात पदाधिकारी , कार्यकर्त्यांच्या भेटीला येत आहेत. नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा त्यांचा दौरा महत्वाचा ठरणार आहे. त्यांच्यासोबत पालकमंत्री नितेश राणे देखील दौऱ्यावर असून सावंतवाडी भाजप जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन सायंकाळी पाच वाजता होणार आहे . यावेळी सावंतवाडी तालुक्यातील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे तथा राणी पार्वती देवी हायस्कूल या संस्थेचे अध्यक्ष विक्रांत विकास सावंत हे भाजप पक्षात प्रवेश करणार आहेत तर त्यांच्यासोबत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे माजी तालुकाप्रमुख मायकल डिसोजा यांचाही भाजपमध्ये प्रवेश होणार आहे . त्यामुळे आज सावंतवाडीत सायंकाळी पाच वाजता पक्षप्रवेश मोठ्या संख्येने होणार आहेत . या पक्षप्रवेशात सावंतवाडी शहरातील अनेक पदाधिकारी कार्यकर्त्यांचाही समावेश आहे. विक्रांत सावंत हे गेल्या काही कालावधीपासून राजकारणापासून अलिप्त होते. मात्र आता ते पुन्हा सक्रिय झाले आहेत. सक्रिय झाल्यानंतर जिल्हा परिषद ,पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांचा हा भाजप प्रवेश घेतला जात आहे. सावंतवाडी तालुक्यात आमदार दीपक केसरकर यांचे वर्चस्व आहे. चार टर्म केसरकर आमदार म्हणून निवडून आले आहेत. अशावेळी भाजप आता सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ नंबर वन करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करत आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये पक्षप्रवेशाचा सिलसिला सुरू झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर हेही कमळ हाती घेणार आहेत . त्यामुळे सावंतवाडी नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपची ताकद अधिक भक्कम होणार आहे.









