मुलींच्या शिक्षणासाठी काम करणारी संस्था
वृत्तसंस्था/ मनीला
फिलिपाईन्सची राजधानी मनीला येथे रविवारी रेमन मेगॅसेसे पुरस्कार विजेत्यांची यादी जाहीर करण्यात आली असून यात भारतातील स्वयंसेवी संस्था एज्युकेट गर्ल्सचे नाव सामील आहे. एखाद्या भारतीय संस्थेला हा प्रतिष्ठित पुरस्कार मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. मुली आणि युवतींच्या शिक्षणाकरता महत्त्वाचे योगदान देण्यासाठी या संस्थेला सन्मानित करण्यात आले आहे. हा पुरस्कार आशियाचा नोबेल म्हणून ओळखला जातो.
एज्युकेट गर्ल्सची स्थापना 2007 मध्ये सेफीना हुसैन यांनी केली होती. सेफीना यांनी लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्समधून शिक्षण मिळविले असून अमेरिकेत काम केल्यावर त्या भारतात परतल्या होत्या. त्यांनी स्थापन केलेल्या संस्थेने राजस्थानातून काम सुरू केले आणि सर्वात मागास भागांमधील मुलींना शाळेशी जोडले. मुलींना उच्च शिक्षण आणि रोजगारापर्यंत पोहोचविण्यासाठी संस्थेने सातत्याने प्रयत्न केले. आतापर्यंत 20 लाखाहून अधिक मुलींना या पुढाकारामुळे लाभ झाला आहे.
नवोन्मेष अन् प्रगती कार्यक्रम
2015 मध्ये संस्थेने जगातील पहिला डेव्हलपमेंट इम्पॅक्ट बॉन्ड शिक्षणच्या क्षेत्रात सुरू केला. याच्या माध्यमातून वित्तीय सहाय्यतेला परिणामांशी जोडण्यात आले. सुरुवात 50 गावांमधून प्रायोगिक तत्वावर झाली होती आणि आता हा पुढाकार भारताच्या 30 हजारांहून अधिक गावांमध्ये फैलावला आहे. संस्थेचा रिटेंशन रेट 90 टक्क्यांपेक्षा अधिक आहे. याचबरोबर प्रगती नावाच्या कार्यक्रमाद्वारे 15-29 वयोगटातील युवतींना ओपन स्कुलिंगची सुविधा दिली जाते. आतापर्यंत यात 31,500 हून अधिक युवती सामील झाल्या आहेत.
अन्य पुरस्कारविजेते
यंदाच्या मेगॅसेसे पुरस्कार विजेत्यांमध्ये मालदीवच्या शाहिना अली आणि फिलिपाईन्सचे फ्लावियानो एंटोनियो एल विलनुएलवा सामील आहेत. अली यांना सागरी पर्यावरणाच्या रक्षणासाठी काम केल्याबद्ददल तर विलनुएवा यांना गरीब आणि शोषितांची प्रतिष्ठा राखण्यासाठी सन्मानित करण्यात येणार आहे. पुरस्कार सोहळा 7 नोव्हेंबर रोजी मनीला येथील मेट्रोपॉलिटन थिएटरमध्ये आयोजित होईल. सर्व विजेत्यांना पदक, प्रमाणपत्र आणि रोख रक्कम पुरस्कारादाखल देण्यात येणार आहे.
भारतासाठी गौरवाचा क्षण
मेगॅसेसे पुरस्कार हा भारताच्या मुलींच्या शिक्षणासाठी चालविण्यात येणाऱ्या जन-आंदोलनाला जागतिक ओळख मिळवून देतो. यापूर्वी भारतातील मदर टेरेसा, जयप्रकाश नारायण, सत्यजीत रे, अरविंद केजरीवाल, किरण बेदी आणि रविश कुमार यासारख्या दिग्गजांना हा पुरस्कार मिळाला आहे. आता एज्युकेट गर्ल्सचे नाव या यादीत सामील होणे देशासाठी मोठी कामगिरी मानली जात असल्याचे सेफीना हुसैन यांनी म्हटले आहे.









