पक्षाध्यक्ष दीपक ढवळीकर यांची माहिती
पणजी : येत्या लोकसभा निवडणुकीत मगो पक्ष भाजपच्या दोन्ही उमेदवारांस पूर्ण पाठिंबा देणार आहे. पक्षाच्या मध्यवर्ती समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत तसा ठराव घेण्यात आला आहे, अशी माहिती पक्षाध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी दिली. रविवारी पणजीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यावेळी नारायण सावंत, राघोबा गावडे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. पुढे बोलताना ढवळीकर यांनी मगो पक्ष सध्या सरकारचा घटक असल्यामुळे येत्या लोकसभा निवडणुकीसाठी स्वतंत्र उमेदवार न ठेवता भाजपच्या उमेदवारासच पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे, असे सांगितले. त्यामुळे भाजपतर्फे जो कोणी उमेदवार उत्तर आणि दक्षिण गोव्यात निवडणूक लढवेल, त्याच्यासाठी मगोचेही पदाधिकारी, कार्यकर्ते काम करतील, असेही त्यांनी सांगितले. माजी आमदार तथा पक्षाच्या कार्यकारी समितीचे अध्यक्ष नरेश सावळ यांनी दिलेला राजीनामा पक्षाने स्वीकारला असल्याची माहिती ढवळीकर यांनी दिली.
पक्षाच्या मतदारसंघ समित्यांसह सर्व समित्यांचा कार्यकाळ 21 डिसेंबर 2023 रोजी समाप्त झाला होता. त्यामुळे त्या बरखास्त करण्यात आल्या आहेत. आता सर्व अधिकार आम्ही केंद्रीय समितीकडे देण्यात आले आहेत. त्यात आमदार, झेडपी, नगरसेवक, पंचसदस्य या सर्वांचा त्यात समावेश असेल, अशी माहिती त्यांनी दिली. लवकरच या समित्यांची पुनर्रचना करण्यात येणार असल्याने कार्यकर्त्यांनी घाबरून जाऊ नये, असेही ते म्हणाले. दरम्यान, मंगळवार दि. 6 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मडगाव येथे जाहीर सभा होणार आहे. त्यावेळी मगोच्या सर्व सदस्य, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन त्यांनी केले. त्याचबरोबर पक्षाचे सदस्य आणि कार्यकर्ते यांनी सार्वजनिक ठिकाणी कोणतेही वक्तव्य करताना त्यांनी सभ्यता पाळून शिस्तीत बोलावे, असे आवाहन त्यांनी केले. कोणत्याही प्रकारे बेशिस्ती खपवून घेण्यात येणार नाही, अशा सदस्यांवर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही ढवळीकर यांनी यावेळी दिला.









