वृत्तसंस्था/ अल रेयान (कतार)
आशियाई चषक पुरूषांच्या फुटबॉल स्पर्धेत जपान आणि इराण या दोन्ही संघांनी प्रतिस्पर्ध्यांवर शानदार विजय नोंदविले. दरम्यान या स्पर्धेत आता जपान आणि इराण या दोन संघांना फेव्हराईट म्हणून ओळखले जात आहे.
या स्पर्धेतील झालेल्या ड गटातील सामन्यात जपानने व्हिएतनामचा 4-2 अशा गोल फरकाने पराभव केला. जपानने आतापर्यंत ही स्पर्धा विक्रमी चार वेळेला जिंकली आहे. क गटातील अन्य एका सामन्यात इराणने पॅलेस्टिनी संघाचा 4-1 असा एकतर्फी फडशा पाडला. या स्पर्धेच्या इतिहासामध्ये गेल्या दोन वेळेला जपान आणि इराण यांना आपले वर्चस्व ठेवता आले नव्हते. 2011 पासून जपान आणि इराण या दोन्ही संघांना ही स्पर्धा जिंकता आलेली नाही. फिफाच्या मानांकनात व्हिएतनामचा संघ 94 व्या स्थानावर आहे. सदर स्पर्धेमध्ये इराणने 1968 ते 1976 या कालावधीत तीन वेळेला अजिंक्यपद मिळविले आहे. इराण आणि पॅलेस्टिनी यांच्यातील सामन्यात पहिल्या 12 मिनिटांच्या कालावधीत इराणने 2-0 अशी आघाडी मिळविली होती. जपान आणि व्हिएतनाम यांच्यातील सामन्यात जपानतर्फे तेकुमी मिनामिनोने 2 गोल नोंदविले. इराण आणि पॅलेस्टिनी याच्यातील सामन्यात करिम अन्सरीफेरादने इराणला पहिल्या 2 मिनिटातच आघाडीवर नेले.
या स्पर्धेतील अन्य एका क गटातील सामन्यात हाँगकाँगने संयुक्त अरब अमिरातचा 3-1 अशा गोलफरकाने पराभव केला. हाँगकाँगचा फुटबॉलपटू फिलिप वॉनने आशिया चषक फुटबॉल स्पर्धेच्या इतिहासातील 1000 वा गोल नोंदविला.









